आपण जीवन जगत असताना दुसऱ्यांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे. यथाशक्ती हा शब्द अंडरलाइन करायचा. तुम्ही एकमेकांकडे पाहून नुसते हसलात तरी पुरे आहे. यथाशक्ती मदत करायची झाली, तर पुष्कळ करता येण्यासारखे आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर तुम्ही मोटारीतून जात आहात व एखादा बससाठी उभा आहे. तुम्ही त्याला लिफ्ट दिलीत, तर त्याला किती आनंद होतो तो पाहा. एखादा आंधळ्याला हात धरून रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली, तर त्याला किती आनंद होईल. बसने प्रवास करत आहात. तुम्ही बसलेले आहात व एखादी बाई कडेवर मुलाला घेऊन उभी आहे. तुम्ही तिला जागा दिलीत, तर तिला किती आनंद होईल. आशीर्वाद तोंडाने द्यायचेच नसतात. आशीर्वाद मनाने द्यायचे असतात. आपण तोंडाने म्हणतो. आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. पण त्यात काही तथ्य नसते. मनाने दिलेले आशीर्वाद खरे असतात. सद्गुंरूना आनंद झाला की तुम्हाला आशीर्वाद आपोआपच मिळतो. आशीर्वाद वेगळा द्यावा लागत नाही. एखाद्याने सुंदर कार्य केले की सद्गुरूंना आनंद होतो व त्याला आपोआपच आशीर्वाद मिळतो. सद्गुरू आनंदित झाले की तुम्हाला पावती मिळाली. तो आनंद तुमच्याकडे परत येणार. नवऱ्याला आनंदित केले की, बायकोला सुख मिळणार. बायकोला सुखी केलेत की नवऱ्याला आनंद मिळाला. एकमेकांना सुखी केले की, सर्व सुखी झाले. जीवनविद्येचे हे तत्त्वज्ञान आहे ते सांगते की, तुम्ही इतरांना ‘यथाशक्ती’ सुखी करण्याचा प्रयत्न करा. ‘यथाशक्ती’ हे अंडरलाइन करायचे. शक्तीच्या बाहेर जाऊन जे करतात ते कोलमडतात, होरपळतात, मोडून पडतात. तुमचा संसार, उद्योग सांभाळा आणि जीवनविद्येचे हे कार्य करा. जीवनविद्येचे हे कार्य करायला आपल्याला वेळ असतो. पण आपण ते करत नाही. कुणाला लाज वाटते. ग्रंथदिंडी करायला लोकांना लाज वाटते. वेळ नाही असे सांगतात. वेळ नाही, तर तुझ्या दुकानात ही पुस्तके ठेव ना. दुकानात येणाऱ्यांचे लक्ष वेधून घे ना. त्यांना ग्रंथाविषयी सांगायचे ते त्यांच्या भल्यासाठी, आपल्या भल्यासाठी नव्हे. ऑफिसमधील तुमचे सहकारी, तुमचे नातेवाईक यांना हे ग्रंथ दाखवा. हे ज्ञानदान तर तुम्ही करू शकता. ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याच्याइतके श्रेष्ठ दान जगात दुसरे नाही. नेत्रदान, देहदान, किडनीदान, अन्नदान, रक्तदान ही सर्व दाने श्रेष्ठच आहेत पण ती कायमस्वरूपी नाहीत.
– सदगुरू वामनराव पै