राजापूर (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी स्वत:ला झोकून देऊन शासकीय सेवा देत असताना आम्हाला दुय्यम दर्जा देत आमच्यावर अन्याय केला जात आहे व असमानतेची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे आमचे प्रश्न शासनस्तरावर मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी राजापूर यांच्या वतीने भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली.
निलेश राणे राजापूर दौऱ्यावर आले असता, या वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी डॉ. हर्षदा भिडे, डॉ. अमृता शेंबवणेकर, डॉ. नगमा बलबले, डॉ. आनंदा सप्रे, डॉ. दिगंबर चौरे, डॉ. आसाराम तांडेल आदी उपस्थित होते. या निवेदनात तदर्थ बीएमएम अधिकाऱ्यांची होत असलेली गळचेपी व मागण्यांबाबत निलेश राणे यांना माहिती दिली. तर सविस्तर निवेदनात आपल्या समस्या सविस्तर मांडल्या आहेत.
यामध्ये तदर्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बीएएमएस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी या पदावर बीएएमएस पदवीधर यांची नियुक्ती करण्यात आली. या शासन निर्णयानुसार सप्टेंबर २०१९ पासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे ८० ते ९० तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी काम करीत आहेत. जिल्ह्याची शासकीय आरोग्य व्यवस्थेचा भार हा मोठ्या प्रमाणावर तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्यावर आहे. तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी हे नियमित वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणेच सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडीत आहेत. जसे की ओपीडी, आयपीडी, प्रसूती, अत्ययिक चिकित्सा, एमएलसी, श्वानदंश, विंचूदंश आदी.
कोविड-१९च्या जागतिक महामारीमध्ये सर्व तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र दिलेली सेवा आपणास ज्ञात आहेच व त्यासाठी त्यांचा कोविडयोद्धा म्हणून सन्मान सर्वत्र झाला आहे. असे असून कोविडसाठी दिला गेलेला प्रोत्साहनपर भत्ता तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांना दिला गेलेला नाही; परंतु आशा, एनएचएमचे इतर कर्मचारी सीएचओ यांना तो प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला आहे.
तदर्थ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी व तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनामध्ये तफावत तर होतीच; परंतु तदर्थ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना प्रति महिना पंधरा हजार वेतन वाढ देण्यात आली आणि तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांना ती वेतनवाढ देण्यात आली नाही. त्यामुळे आता तदर्थ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी व तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनामधील तफावत खूपच वाढली आहे.