मीनाक्षी जगदाळे
मागील लेखात आपण पाहिले की, एकमेकींना मानसिक त्रास देण्यात एकमेकींचे मनोबल, मनोधैर्य कमी करण्यात महिलाच जास्त अग्रेसर असल्याचे दिसतात. कोणाचेही रंग, रूप, आर्थिक परिस्थिती त्याच्या हातात नसते. कोणत्याही स्त्रीला आपण छान असावे, छान दिसावे, छान राहावे हेच वाटत असते. आपली सर्वांनी स्तुती करावी, आपल्या गुणांची दखल घ्यावी, आपल्या चांगल्या वागणुकीचे कौटुंबिक तसेच सामाजिक पातळीवर कौतुक व्हावे यासाठी प्रत्येक महिला आसुसलेली असते. त्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्नदेखील करत असते. प्रत्येकात काही ना काही कामतरता असणे नैसर्गिक आहे. आपण त्याच त्या कमतरतेला धरून एखाद्या स्त्रीला नाउमेद करत राहायचं की तिच्यातील चांगल्या गुणांवरून तिला प्रोत्साहन द्यायचे, तिचे आयुष्य सुखकर करायचे हा आपापल्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मुळात आपण बघतोय किंवा समजतोय इतकी ती चुकीची आहे का, तिच्या सवयी, वागणूक, व्यक्तिमत्त्व इतके खराब आणि निंदनीय आहे का जितके आपण तिची बदनामी करीत आहोत? निंदा करीत आहोत? याचा विचार महिलांनी करणे आवश्यक आहे असे वाटते. एखादीला पूर्ण शत्रू मानणे, तीच तोंड बघायची देखील इच्छा नसणे, एखादीशी कायमचे संबंध तोडणे, एखादीचा टोकाचा तिरस्कार करणे यासारखी खुनशी वृत्ती महिलांमध्ये पाहायला मिळते. ज्या स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं, त्या स्त्रीशक्तीने स्वतःच्या विचारांवर, दृष्टिकोनावर, वागणुकीवर खूप काम करणे आवश्यक आहे असे वाटते.
अनेकदा कौटुंबिक समुपदेशन करताना असे जाणवते की, शक्यतो आपल्या सुनांची गाऱ्हाणी सांगताना सासरचे लोक, पती, सासू, नणंदा, जावा अथवा मुलीच्या माहेरचे म्हणजेच मुलीची आई, वडील, भाऊ, बहीण अथवा मुलीच्या माहेरचे लोक एकमेकांबद्दल प्रचंड नकारात्मक बोलत असतात. यामध्ये सुद्धा एकमेकींना बदनाम करण्यात, एकमेकींवर आरोप करण्यात महिलाच जास्त अग्रेसर असल्याचे जाणवते.
ज्या मुलीला आपण सून म्हणून पसंत केले, जिचे रंग-रूप, कला, गुणवत्ता आणि गुण पाहून आपण तिला स्वीकारले. ती नंतर इतकी वाईट कशी ठरू शकते? हा धक्कादायक प्रकार आहे. लग्नानंतर किंवा कोणताही वादाचा प्रसंग आल्यानंतर तिच्यातील एकही चांगला गुण, एकही चांगली सवय, चांगला स्वभाव आपल्याला का आठवत नाही? चुकीच्या गोष्टींचा सगळंच्या सगळं खापर महिला एकमेकींवर फोडताना दिसतात. प्रत्येक चुकीच्या प्रसंगाला, अप्रिय घटनेला घरातील एकच स्त्री सदैव कशी जबाबदार असेल? हा सारासार विचार करण्याची बौद्धिक मानसिक परिस्थिती नि तसा दृष्टिकोन बहुतांश बायकांकडे नसल्याचे जाणवते. एखादी आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, आपलं ऐकत नाही म्हणजेच ती चुकीची आहे, अशी कमकुवत मानसिकता महिलांमध्ये जाणवते.
जेव्हा कोणत्याही घरात काहीही चुकीचे होते, तेव्हा त्याला घरातील प्रत्येक सदस्य थोडा फार का होईना जबाबदार असतोच. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रत्येकजण चुकलेला असतो. मुद्दाम नाही पण अनावधानाने का होईना विनाशाला, चुकीच्या निर्णयांना, नुकसानीला घरातील सगळ्यांचाच हातभार लागलेला असतो. पण हे मोठ्या मनाने मान्य करण्याची अनेकदा महिलांची तयारी नसते. कायम मीच बरोबर, माझंच खरं असा हेकेखोर आणि हट्टीपणा कौटुंबिक शांततेला प्रचंड त्रासदायक ठरू शकतो.
आपल्याच घरातील, आपल्याच नात्यातील, आपल्याजवळील स्त्रीच्या चुकांचा पाढा अनेक महिला बिनदिक्कत वाचून दाखवतात. शिकलेली असेल, तर “शिकली आहे म्हणून अतिशहाणी आहे”, कमी शिक्षण असेल, तर “अर्धवट आहे, अजून अक्कल आलेली नाही.” वयाने लहान असेल, तर “अजून समजच आलेली नाही”, पुरेसं वय असेल, तर “खूप अॅडव्हान्स आहे.” एकुलती एक असेल, तर “कौटुंबिक दृष्टीने अनुभवी नाही, लाडाने वेडी झालेली आहे.” मोठ्या कुटुंबातील असेल, तर “छक्केपंजे करते, राजकारण करते.” गरिबाची असेल, तर “तिला आमच्यासारखे स्टँडर्ड नाही, राहणीमान नाही”, मोठ्या घरची असेल, तर “आई-बापाच्या पैशाचा माज आहे, त्यांच्या जीवावर उड्या मारते, त्यांच्या जीवावर जगते.” यांसारख्या नानाविध उपाध्या महिला एकमेकींबद्दल बोलताना वापरतात.
एक महिला दुसऱ्या महिलेला जेव्हा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलते, तेव्हा त्यांना मर्यादा घालण्याचे कामसुद्धा तिसरी महिला खूप क्वचित करताना दिसते. आपल्या सोयीनुसार कोणाचीही कधी कशी बाजू घ्यायची, आपले विसंगत बोलणे कसे इतरांच्या गळी उतरवायचे, कोणी चांगल्या उद्देशाने मध्ये पडलीच, तर तिलाही कस गप्प करायचं या नानाविध कला महिलांना आवगत असल्याचे निदर्शनास येते. फक्त एखादीची पाठ फिरण्याचा अवकाश महिलांना तिच्याबद्दल बोलायला असा काही उत्साह येतो की, तिला याची सूतराम कल्पना नसते.
वास्तविक प्रत्येक महिला अनेक चांगल्या-वाईट अनुभवातून गेलेली असते. एकमेकांना आधार देणे, प्रेम देणे, आत्मविश्वास देणे हे प्रत्येकीच कर्तव्य आहे. चारचौघांत एकमेकींना बेइज्जत करण्यापेक्षा, परस्परांचे कान भरण्यापेक्षा महिलांनी स्वतः खंबीर होणे आणि इतर महिलांच्या पाठीशीदेखील खंबीर उभे राहणे आवश्यक आहे. आपल्यात कोणतही नातं असू दे, पण एकमेकींच्या मैत्रिणी व्हा, एकमेकींचा आदर करा, प्रत्येकीला समजावून घेण्याचा प्रयत्न करा. हा विषय प्रत्येक महिलेने आत्मसात करणे आणि त्यानुसार आपल्या विचारात वागणुकीत बदल करणे आवश्यक आहे. जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजावून घेत नाही, तोपर्यंत महिला सबली करणं, महिला सशक्तिकरण, अन्नपूर्णा, स्वयंपूर्णा, सबला, स्त्री शक्ती या सर्व संकल्पना फक्त भाषणात, चर्चेत, लिखाणात राहतील. या संकल्पनांना तेव्हाच अर्थ प्राप्त होईल जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला, तिच्या भावनांना ओळखेल. कुटुंबात वावरतानासुद्धा परस्परांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा, कामावरून, जबाबदाऱ्यांवरून आपसात कलह करण्यापेक्षा एकत्र येऊन एक विचाराने आपण काय चांगल करू शकतो, यावर विचार होणे आवश्यक आहे. चुकूनही आपल्याकडून आपल्या घरातील स्त्रीला दुःख होणार नाही, तिच्या डोळ्यांत पाणी येणार नाही, याची खबरदारी प्रत्येकीने घ्यावी. स्वतःच्या तसेच इतरांच्याही आवडी-निवडी सांभाळा, छंद सांभाळा, स्वतःचं आयुष्य जगताना इतर महिलांच्या आयुष्यालादेखील सकारात्मक दिशा द्या.