संदीप जाधव
बोईसर : झांझरोळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमधून गळती निर्माण झाली असल्याने या धरणाच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. मात्र ते करताना पाणीपुरवठ्याबाबत पर्यायी उपाययोजना करण्यात जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरली आहे. परिणामी, झांझरोळी धरणाचे दुरुस्तीच्या कामासाठी १५ दिवसांपासून १७ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
त्यामुळे तेथील महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकाण्याची वेळ आल्याने संतापाचे वातावरण आहे.
केळवे रोड झांझरोली येथील धरणांमध्ये अचानक भगदाड पडल्याची घटना ८ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. या धरणांमधून पाणी सोडण्यात येणाऱ्या विहिरीमधून गळती झाल्याचे निदर्शनास आल्याने विहिरीच्या अवतीभवती मुरूम मातीचा भराव करून गळती रोखण्यात आली होती.
पाटबंधारे विभाग पाण्याचा निचरा होणाऱ्या भागात दुरुस्ती करत असल्याने त्याच्याऐवजी २५ हॉर्स पॉवर क्षमतेचे दोन तरंगणाऱ्या व्यवस्थेवर पंप बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. या कामासाठी अंदाजित २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या धरणावर अवलंबून १७ गावांमधील एक ते दीड लाख लोकसंख्येला दररोज दीड दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करण्याची योजना होती मात्र दुरुस्तीमुळे ती बंद झाली आहे.
जिल्हा परिषदेने तरंगत्या प्रणालीवर पंप बसवून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला आहे. काही दिवसांपूर्वी महिला बालकल्याण समितीचा दौरा तसेच त्यापूर्वी महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामाला अजूनही प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही, असे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येते.
या गावांचा समावेश
पाणीपुरवठा विभागातील नियोजनाचा अभाव तसेच जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामधील असमन्वय यामुळे १५ दिवसांपासून दातिवरे, खार्डी, आगरवाडी, माकुणसार, कोरे, मथाणे, डोंगरे, नगावे, भादवे आदी १७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.
झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून आठवड्याभरात पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.– वैदेही वाढाण,जिल्हा परिषद अध्यक्षा, पालघर
गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने माकूणसार, आगरवाडी, दातीवरे, कोरे आदी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल. – गौतम वर्तक, दातीवरे, ग्रामपंचायत सदस्य