गौसखान पठाण
सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली बसस्थानकातील स्लॅब नसलेला नाला घाण, दुर्गंधी आणि दुर्घटनेमुळे धोकादायक ठरत आहे. तब्बल दीड वर्षांपासून उघडा व धोकादायक स्थितीत असलेल्या या नाल्याकडे परिवहन महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रवासी व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मागील वर्षी ३० ऑगस्टला या उघड्या नाल्यात एक बाईकस्वार पडून जखमी झाला होता. आजूबाजूच्या लोकांनी बाईक व बाईकस्वाराला अथक प्रयत्नांनी बाहेर काढले. ५ नोव्हेंबर २०२० रोजी स्थानकात तुंबलेले सांडपाणी काढण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने परिवहन मंडळाच्या परवानगीने हा नाला व त्यावरील स्लॅब तोडला होता. मात्र दीड वर्षे उलटून गेले तरी या नाल्यावर पुन्हा स्लॅब टाकण्यात आलेला नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीने सांगितले होते की, हा नाला दुरुस्त करण्याची जबाबदारी परिवहन मंडळाची आहे. तथापि, परिवहन मंडळाने त्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. मागील वर्षी स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास सुरुवात झाली होती.
त्यावेळी हा नाला दुरुस्त होईल, असे वाटत होते. मात्र, काही कारणांमुळे लगेच नूतनीकरणाचे काम थांबल्याने अजूनही हा नाला ‘जैसे थे’ आहे. स्लॅब नसल्याने नाला धोकादायक झाला आहेच. शिवाय त्यातील सांडपाणी, घाण व दुर्गंधी यामुळे स्थानकात येणारे प्रवासी, आजूबाजूचे दुकानदार व नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. पावसाळ्यात ही स्थिती न सुधारल्यास गंभीर रूप धारण करू शकते, अशी भीती नागरिक व प्रवासी व्यक्त करत आहेत.
प्रवेशासाठी एकच मार्ग
स्थानकात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. मात्र, एका मार्गावरील नाल्याचा स्लॅब तोडल्याने स्थानकात ये-जा करणाऱ्या गाड्यांना व प्रवाशांना फक्त एकच मार्ग राहिला आहे. त्यामुळे चालक व प्रवासी यांची गैरसोय होते. एकाच वेळी स्थानकात आत जाणारी व बाहेर येणारी बस समोरासमोर आल्यास कोंडी होते.
स्थानकातील दुरुस्तीच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. येथील साफसफाई, नालादुरुस्ती व इतर कामांबाबत आमच्या कार्यालयातून जे शक्य होईल ती कामे करून घेऊ. – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, पेण-रायगड
स्थानकाच्या नूतनीकरणासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. येथील उघड्या नाल्यातील घाण व दुर्गंधीमुळे प्रवासी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे लागलीच या नाल्यावर स्लॅब टाकण्यात यावा आणि स्थानक परिसरात साफसफाई केली जावी, यासाठी परिवहन मंडळाकडे मागणीसुद्धा केली आहे.– रवींद्रनाथ ओव्हाळ, उपोषणकर्ते व सामाजिक कार्यकर्ते, सुधागड