Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीकॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवाशांना कोरोनाची लागण

कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवाशांना कोरोनाची लागण

गोवा : ऑक्टोबरमध्ये अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ज्या कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापे टाकले होते ती क्रूझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईहून गोव्याला आलेल्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील सुमारे दोन हजार प्रवाशांपैकी ६६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली.

गोवा सरकारच्या आरोग्य विभागाच्या पथकाने जहाजावरील प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा जहाज गोव्यामधील बंदराला लागले तेव्हाच कोरोना चाचण्या केल्या होत्या. रविवारी चाचण्यांचे अहवाल समोर आल्यानंतर ६६ लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारीही अन्य प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांनी जहाजावरच थांबणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोव्यात शाळा आणि महाविद्यालये २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रात्रीच्या जमावबंदीचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी कोरोना कृती दलाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोवा सरकारने काही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात रविवारी कोरोना रुग्णवाढीचा दर १०.७ टक्के होता. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कृती दलाची बैठक घेतली. ‘‘कोरोना रुग्णवाढीमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांची शारीरिक सत्रे बंद राहतील. लस घेण्यासाठी ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल. लसीकरण झाल्यानंतर त्यांना शाळेत येण्याची गरज नाही,’’ असे कृती दलाचे सदस्य शेखर साल्कर यांनी सांगितले.

गोव्याच्या आरोग्यमंत्री राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी चार ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळले आहे. त्यापैकी एक रुग्ण गोव्याचा असून त्याने परदेश प्रवास केलेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -