Saturday, August 29, 2026

Chitrakoot Flood : चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीला महापूर; रामघाट परिसर पाण्याखाली, 200 जणांची सुटका

Chitrakoot Flood : चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीला महापूर; रामघाट परिसर पाण्याखाली, 200 जणांची सुटका

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रामघाट परिसरातील अनेक मंदिरे, आश्रम, मठ, दुकाने आणि नदीकाठावरील हॉटेल्समध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पुरामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 90 वर्षांत मंदाकिनी नदीला एवढा मोठा पूर पाहायला मिळाला नव्हता. ( Chitrakoot Flood)

पुराच्या पाण्यामुळे चित्रकूटमधील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. मंदाकिनी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पुलावरून पाणी वाहत असल्याने अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. झाशी-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावरही खबरदारी म्हणून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. शहराला जोडणाऱ्या मुख्य पुलाच्या काही भागालाही पुराचा फटका बसला आहे.

https://www.prahaar.in/2026/08/29/lawyer-dies-of-a-heart-attack-while-riding-a-two-wheeler-in-thane-heart-wrenching-incident-captured-on-cctv-camera/

कटरा गदूर गावात पुराची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तरावन परिसरातील मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. रामघाट परिसरातील दुकाने आणि हॉटेल्समध्ये पाणी शिरले आहे. जानकीकुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी भगवान आश्रम, आरोग्यधाम, सद्गुरू सेवा संघ आश्रम आणि जगद्गुरू रामभद्राचार्य आश्रमासह अनेक ठिकाणी पुराचे पाणी पोहोचले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. एसडीआरएफच्या पथकांनी रात्रीच्या वेळीही बचावकार्य सुरू ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे 200 नागरिकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये वृद्ध, महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे आणि आवश्यक मदत पुरवली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. ( Mandakini River)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा