Saturday, August 29, 2026

Nashik : आश्रमशाळेतून सहा विद्यार्थी अचानक बेपत्ता, मध्यरात्रीनंतर वैतरणा नदीकाठी सापडले ; पण नेमकं घडलं काय ?

Nashik : आश्रमशाळेतून सहा विद्यार्थी अचानक बेपत्ता, मध्यरात्रीनंतर वैतरणा नदीकाठी सापडले ; पण नेमकं घडलं काय ?

Nashik : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वैतरणा नगर येथील शासकीय आश्रमशाळेतून शाळा सुरू असताना मधल्या सुट्टीत तब्बल सहा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थ्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. अखेर मध्यरात्रीनंतर वैतरणा नदीच्या काठावरील झाडाझुडपांमध्ये घाबरलेल्या अवस्थेत ही मुलं आढळून आली. मुलं सापडल्याने अखेर विद्यार्थ्यांच्या पालकांसह शाळा प्रशासन आणि शोधमोहीमेत सहभागी झालेल्या यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला. (Nashik News)

नेमकं काय घडलं ?

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथे शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत परिसरातील तसेच शाळेनजीकच्या गावांमधून शिक्षणासाठी विद्यार्थी येथे येतात. गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शिक्षकांचा डोळा चुकवून पाचवीतील संदीप वारे, सातवीतील राजू बांगारे, रवी बांगारे, सहावीतील भास्कर बांगारे, सातवीतील रस्मा गोरे आणि तेजस वारे हे सहा विद्यार्थी सुरक्षा रक्षकांना गुंगारा देत शाळेच्या आवारातून बाहेर पडले. दरम्यान वेळ उलटूनही ही मुले घरी न परतल्याने पालकांची चिंता वाढली. अखेर पालक शाळेत दाखल झाले अन् मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचीही धावपळ सुरू झाली.

६ विद्यार्थी असे अचानक बेपत्ता झाल्याने शाळेच्या वतीने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर पालक, नातेवाईक, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा येथून देवगाव येथे जाऊन ही मुले आपल्या घरी जाणार होती. त्यामुळे गावाजवळील परिसरासह शाळेकडे जाणारे रस्ते, पायवाटा आणि आजूबाजूच्या भागातही शोध घेण्यात आला. अखेर मध्यरात्रीनंतर वैतरणा नदीच्या काठावर अंधारात झाडाझुडपांचा आधार घेत लपून बसलेली ही सहाही मुले दिसून आली. (Nashik News)

शेतकऱ्यांने धमकावल्याने विद्यार्थी घाबरले

दरम्यान, शाळेजवळील परिसरात एका व्यक्तीने उसाची शेती केली आहे. गुरुवारी मधल्या सुट्टीत ही मुले शाळेबाहेर पडली होती. त्यापैकी काही मुलांनी शेतातील ऊस तोडल्याचे समोर आले. त्यानंतर शेताच्या जागामालकाने मुलांना धमकावले. हा प्रकार शिक्षक आणि पालकांना सांगण्याची धमकी दिल्याने घाबरलेली मुले तेथून निघून गेली.यानंतर जागामालकाने शाळेत येऊन विद्यार्थ्यांनी शेतातील ऊस तोडल्याची माहिती दिली. त्यावेळीच संबंधित विद्यार्थी शाळेतून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने पालक, पोलिस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली, अशी माहिती शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जगदीश गायकवाड यांनी दिली. अखेर सहा विद्यार्थी सुखरूप सापडल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >