मुंबई : ईद मिलाद-उन-नबीच्या (Eid Milad) मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ-चिंचपोकळी परिसरात दोन गटांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. लक्ष्मी कॉटेज परिसरात घोषणाबाजीवरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. यावेळी दगडफेक झाल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी कॉटेजजवळ दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्यानंतर वाद सुरू झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून, त्यामध्ये जमाव आणि पोलिसांमध्ये धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. ( Parel Chinchpokli Tension)
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवले. खबरदारीचा उपाय म्हणून परळ, चिंचपोकळी आणि परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच काही मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती बंद करून वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. (Mumbai Police)
मुंबई पोलीस सहआयुक्त मनोज शर्मा यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
View this post on Instagram
पुणे : दिघी परिसरातील एका सोसायटीत झालेल्या तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांच्या घरफोडीचा तपास दिघी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी 757 ...
दरम्यान, या घटनेनंतर भायखळा-लालबाग-परळ पूल काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून सतत देखरेख ठेवण्यात आली. काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या झटापटीत काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, जखमी आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
View this post on Instagram
सध्या परळ-चिंचपोकळी परिसरात परिस्थिती शांत असून वाहतूकही पूर्ववत होत आहे. नागरिकांनी कोणतीही अपुष्ट माहिती किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Stone Pelting)






