Thursday, August 27, 2026

Mumbai Airport T1 Redevelopment : मुंबई विमानतळाचा T१ टर्मिनल होणार बंद; फ्लाइटसाठी नवी मुंबई विमानतळाचा पर्याय

Mumbai Airport T1 Redevelopment : मुंबई विमानतळाचा T१ टर्मिनल होणार बंद; फ्लाइटसाठी नवी मुंबई विमानतळाचा पर्याय

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T१ टर्मिनलच्या पुनर्विकासाची तयारी सुरू झाली आहे. सुमारे ८० वर्षे जुन्या टर्मिनलच्या उत्तर भागाचे पाडकाम १५ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात T१ वरून होणाऱ्या विमानसेवांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार असून, काही प्रवाशांना फ्लाइट पकडण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) गाठावे लागू शकते. (Mumbai Airport T1 Redevelopment)

विमानसेवांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर :

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) कडून विमानतळावरील कामकाजाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. योजनेनुसार १ ऑक्टोबर २०२६ पासून किमान एक-तृतीयांश आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्यात येणार आहे. यानंतर २५ ऑक्टोबर २०२७ पासून T१ वरील किमान एक-तृतीयांश विमानसेवा T२ वर स्थलांतरित करण्याची योजना आहे. विमान कंपन्यांना या बदलासाठी सुमारे साडेतीन महिन्यांचा संक्रमण कालावधी दिला जाणार आहे. (Mumbai Airport T1 Redevelopment)

Akasa Airची सेवा T२ वर :

विमानसेवांच्या स्थलांतराला सुरुवातही झाली आहे. Akasa Airने १ ऑगस्ट २०२६ पासून आपली देशांतर्गत विमानसेवा T१ वरून T२ वर हलवली आहे. याशिवाय MIALकडून इतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी त्यांच्या काही सेवा T१ वरून T२ आणि T२ वरून NMIA येथे हलवण्याबाबत चर्चा सुरू आहे. (Mumbai Airport T1 Redevelopment)

८० वर्ष जुन्या T१ चा पुनर्विकास :

मुंबई विमानतळावरील T१ हे जवळपास ८० वर्षे जुने टर्मिनल आहे. पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात T1Bच्या उत्तर भागाचे पाडकाम करण्यात येणार आहे. प्रवाशांना कमीत कमी त्रास होण्यासाठी विमानसेवांचे नियोजनबद्ध पद्धतीने पुनर्वाटप केले जाणार आहे. (Mumbai Airport T1 Redevelopment)

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ एकाच समूहाच्या मालकीचे :

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांशी अदानी समूहाचा संबंध आहे. मुंबई विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता सध्या वर्षाला ५ कोटींहून अधिक असून, दररोज ९५० हून अधिक विमानांची ये-जा होते. (Mumbai Airport T1 Redevelopment)

प्रवाशांनी काय लक्षात ठेवावे?

T1च्या पुनर्विकासामुळे आगामी काळात विमानतळ आणि टर्मिनलनुसार विमानसेवांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट बुक केल्यानंतर आणि प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून विमानतळ व टर्मिनलची माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणाऱ्या फ्लाइटसाठी प्रवासाचे अतिरिक्त नियोजन करावे लागू शकते. (Mumbai Airport T1 Redevelopment)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >