Tuesday, August 25, 2026

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. यापूर्वी नितीन गडकरी हे या मंडळात होते, मात्र ते बाहेर झाल्यानंतर महाराष्ट्राचा एकही नेता या समितीत नव्हता.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी अलीकडेच नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यानंतर आता संसदीय मंडळातील बदलांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शंभराहून अधिक जागा मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि यशस्वी कामगिरीमुळे केंद्रातील त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या या संभाव्य नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीबद्दल आणि त्यांना केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याबाबत सतत चर्चा सुरू असतात. विरोधकांकडून ते नवे शिक्षणमंत्री होतील असे दावे केले जात असले, तरी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे फडणवीसांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या वाढलेल्या दिल्लीच्या वाऱ्यांमुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

संसदीय मंडळात कोणकोण?

भाजपच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह एकूण १२ जणांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला या सर्वोच्च मंडळात स्थान देण्याचा प्रघात राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना ही संधी मिळाल्यास त्यांचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे केंद्रातील स्थान अधिक उंचावणार आहे. फडणवीसांच्या या संभाव्य राष्ट्रीय जबादारीकडे त्यांच्या भावी केंद्रीय राजकारणाची पहिली पायरी म्हणून पाहिले जात असून, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >