Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला लासलगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा माल, सॅन्ट्रो कार आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी हत्यारे असा एकूण ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
नेमकं प्रकरण काय ?
विंचूर (Vinchur) येथील लासलगाव रोडवर गोकुळ बाळनाथ काळे यांचे लोणजाईमाता इलेक्ट्रिकल वर्क्स अँड हार्डवेअर दुकान आहे. १८ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्यांच्या वायर असा सुमारे ३ लाख ४३ हजार २१६ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.१९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता विंचूर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे (Lasalgaon Police Station) अंमलदार अमोल तळेकर यांना विंचूर भागात संशयित वाहन फिरत असल्याची माहिती मिळाली. (Nashik Crime News)
Nashik Crime : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या महिलेच्या ...
पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला असता, संशयितांनी वाहन विंचूर-निफाड मार्गावरून (Vinchur-Niphad Road) विंचूर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळविले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून ते थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीचा मुद्देमाल तसेच लोखंडी कटर व पहार आढळून आले. संशयिताची चौकशी केली असता, त्याने विंचूर परिसरातील इलेक्ट्रिकल व हार्डवेअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित खुर्शीद अब्दुल हमीद खान (मूळ रा. धानोरा मुस्तकम, ता. सोहरतगढ, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रहिवासी आंबेडकरनगर, इगतपुरी) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ४३ हजार २१६ रुपयांचा चोरीचा माल, सुमारे १ लाख रुपये किमतीची सॅन्ट्रो कार (एमएच ०४ एएम ३४६७), लोखंडी कटर व पहार असा एकूण ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Nashik Crime News)
आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरी, घरफोडीचे गुन्हे
अटक केलेल्या आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून आणखी कोणते गुन्हे उघडकीस येतात, तसेच त्याचे इतर साथीदार कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपीला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nashik Crime News)
पुढील तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. तसेच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करत आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.






