Thursday, August 20, 2026

Maharashtra Politics : ‘संजय राऊतांना कितीही मिरच्या झोंबल्या तरी जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार’; भाजपचा टोला

Maharashtra Politics  : ‘संजय राऊतांना कितीही मिरच्या झोंबल्या तरी जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार’; भाजपचा टोला

मुंबई:  अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केल्यावरून भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधत, जगभरातून महाराष्ट्राच्या कामाचे कौतुक होणार असून त्याचा काही जणांना त्रास होत असल्याचे म्हटले आहे. (Sanjay Raut)

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री असल्याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दिला आहे, असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो आणि अटल सेतूसारखी कामे झाली असून मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काची घरे मिळाली, असेही त्यांनी सांगितले. (BJP)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बन यांनी टीका केली. त्यांच्या कार्यकाळात टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पत्रकारांना अटक करण्यात आली आणि लोकांची घरे पाडण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले असल्याचे सांगत त्यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. (Navanath Ban)

दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरूनही भाजपने उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे प्रतीक असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला. संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर जाऊन वेगळ्या राजकीय विचारांना जवळ केल्याची टीकाही त्यांनी केली. (Uddhav Thackeray)

झेन जी आणि पहिल्यांदा मतदान करणारे तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा दावाही बन यांनी केला. महाराष्ट्रातील तरुणांचे भवितव्य घडवण्याचा अजेंडा मोदी आणि फडणवीस यांचा असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >