Thursday, August 20, 2026

Global Coast Guard Summit : फेब्रुवारी 2027मध्ये तटरक्षक दलाची पाचवी जागतिक शिखर परिषद; भारताकडे यजमानपद

Global Coast Guard Summit : फेब्रुवारी 2027मध्ये तटरक्षक दलाची पाचवी जागतिक शिखर परिषद; भारताकडे यजमानपद

नवी दिल्ली : भारतीय तट रक्षक दलाच्या स्वर्णिम जयंतीच्या निमित्ताने, भारत फेब्रुवारी 2027 मध्ये नवी दिल्ली इथे तट रक्षक दलाच्या 5 व्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, भारतीय तट रक्षक दलाने आज तट रक्षक दलाच्या 5 व्या जागतिक शिखर परिषदेची कार्यकारी स्तरावरील बैठक प्रत्यक्ष आणि दूरदृश्य माध्यम अशा मिश्र पद्धतीने घेतली.

चर्चेमध्ये आगामी शिखर परिषदेशी संबंधित महत्त्वाच्या संस्थात्मक आणि संघटनात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामध्ये शिखर परिषदेच्या बैठकीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करणे, माहिती प्रसारणाची यंत्रणा अधिक सक्षम करणे तसेच परिषदेच्या संकेतस्थळाचा पुढील विकास आणि व्यवस्थापन यांचा समावेश होता. व्यावसायिक कौशल्य, कार्यानुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या अधिक व्यापक देवाणघेवाणीच्या माध्यमातून सामूहिक क्षमता बांधणीच्या विविध मार्गांचाही चर्चेदरम्यान विचार करण्यात आला.

कार्यकारी स्तरावरील बैठकीने 5 व्या परिषदेची संस्थात्मक पूर्वतयारी पुढे नेण्यासाठी तसेच सहभागी सागरी संस्थांमध्ये संवाद आणि समन्वय सुलभ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सहभागी संस्थांमधील सातत्यपूर्ण सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि सागरी भागीदारी अधिक दृढ करणे या उद्देशाने भविष्यातील सहकार्यात्मक उपक्रमांसाठी प्रस्तावित कृती दिनदर्शिकेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. 5 वी परिषद ही भारताच्या ‘महासागर’ या संकल्पनेचे आणि सहकार्यात्मक, सर्वसमावेशक व भविष्याभिमुख सागरी व्यवस्था निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे महत्त्वपूर्ण प्रतीक ठरेल. सातत्यपूर्ण सहभाग आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून, भारतीय तट रक्षक दल जागतिक सामायिक सागरी क्षेत्राच्या सुरक्षितता, सुरक्षा आणि कल्याणासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास कटिबद्ध आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >