Thursday, August 20, 2026

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब' असेल नाहीतर 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत', या भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडल्यानंतर, आता अक्षय खन्ना एका मोठ्या पौराणिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या 'महाकाली' या चित्रपटात तो असुरांचे गुरु 'शुक्राचार्य' यांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाची पहिली झलक २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्राचार्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची पौराणिक कथा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चित्रपटात अक्षय खन्नासोबत भूमी शेट्टी आणि रोहित सराफ हे दिसणार आहेत.

केवळ 'असुरांचे गुरु' एवढीच ओळख नाही

अनेकदा शुक्राचार्यांची ओळख ही केवळ 'असुरांचे गुरु' म्हणूनच करून दिली जाते, ज्यामुळे त्यांना केवळ एक खलनायक समजले जाते. मात्र, पौराणिक आणि महाभारतातील कथांनुसार शुक्राचार्य हे महर्षी भृगु व काव्यमाता यांचे पुत्र होते. त्यांना 'काव्य' आणि 'उशना' या नावांनीही ओळखले जाते. ते केवळ असुरांचे मार्गदर्शकच नव्हे, तर अत्यंत प्रखर तपस्वी, कुशल रणनीतीकार, बुद्धिवान आणि मंत्रविद्येचे महान ज्ञानी होते. देव आणि असुरांच्या युद्धात देवगुरु बृहस्पती आणि शुक्राचार्य यांच्यातील बुद्धिमत्तेची आणि रणनीतीची मोठी परीक्षा पाहायला मिळत असे.

'मृत संजीवनी' विद्या

मृत असुरांना जिवंत करणारी 'मृत संजीवनी' विद्या शुक्राचार्याकडे होती, ज्याद्वारे ते मृत व्यक्तीला (प्रामुख्याने असुरांना) पुन्हा जिवंत करू शकत असत. देव आणि असुर संग्रामात जेव्हा एखादा असुर मारला जाई, तेव्हा शुक्राचार्य या विद्येच्या जोरावर त्याला पुन्हा जिवंत करत असत. ही विद्या प्राप्त करण्यासाठी देवगुरु बृहस्पतींचा मुलगा 'कच' हा शुक्राचार्यांच्या आश्रमात शिष्य बनून गेला होता. असुरांनी कचला मारण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी शुक्राचार्यानी त्याला जिवंत केले. एकदा असुरांनी कचची राख दारूमध्ये मिसळून शुक्राचार्यांना पाजली. तेव्हा शुक्राचार्यानी आपल्या पोटात असलेल्या कचला स्वतः मृत संजीवनी विद्या शिकवली, जेणेकरून तो बाहेर आल्यावर आपल्या गुरूंना पुन्हा जिवंत करू शकेल.

शुक्राचार्य आणि विष्णूंचा वामन अवतार

आपल्या दानशूर वृत्तीसाठी नावाजल्या जाणाऱ्या बळीच्या कथेतही शुक्राचार्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जेव्हा भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेऊन तीन पावले जमिनीची मागणी केली, तेव्हा शुक्राचार्यांनी वामनरुपी भगवान विष्णूंना ओळखले. त्यांनी राजा बलीला दान न देण्याबाबत सावध केले होते, जे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते.

'महाकाली' चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा

अक्षय खन्नाच्या या नव्या लूकमुळे चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'महाकाली' हा चित्रपट शुक्राचार्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वापैकी कोणत्या रुपाला अधोरेखित करणार हे पाहण्याजोगं आहे. केवळ एक उग्र रूप दाखवलं जाणार की त्यांच्यातील ज्ञानी, तपस्वी आणि रणनीतीकार असलेल्या पैलूलाही समोर आणणार, हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >