Wednesday, August 19, 2026

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, महिला एकेरीत उन्नती हुड्डा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे. तर महिला दुहेरीतील ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने थेट उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मंगळवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत 14वा मानांकित लक्ष्य सेनला ऑस्ट्रियाच्या कॉलिन्स व्हॅलेंटाईन फिलिमॉनने पहिल्या गेममध्ये चांगलेच अडचणीत आणले. फिलिमॉनने पहिला गेम 21-16 असा जिंकला. मात्र लक्ष्यने परिस्थिती झटपट बदलत पुढील दोन्ही गेममध्ये 21-8, 21-4 अशी बाजी मारली. 45 मिनिटांच्या या सामन्यात शानदार पुनरागमन करत लक्ष्यने दुसरी फेरी गाठली. आता त्याची लढत अमेरिकेच्या गॅरेट टॅनशी होणार आहे. महिला एकेरीत 18 वर्षीय उन्नती हुड्डाने म्यानमारच्या थेट हतार थुझारचा 22-20, 21-16 असा पराभव करत आपल्या पहिल्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सुरुवात केली. उन्नतीने 40 मिनिटांच्या लढतीत संयमी खेळ करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिची पुढील लढत कॅनडाच्या 13व्या मानांकित मिशेल लीशी होणार आहे. महिला दुहेरीत मात्र ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने शानदार विजय मिळवला. बिगरमानांकित भारतीय जोडीने 16व्या मानांकित अमेरिकेच्या लॉरेन लॅम-अॅलिसन ली जोडीचा 21-15, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयामुळे त्यांनी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

मिश्र दुहेरीत भारताला मात्र धक्के बसले. रोहन कपूर-रुत्विका शिवानी गड्डे तसेच अशिथ सूर्या-अमृता प्रमुथेश या जोड्यांना पराभव पत्करावा लागला. अशिथ-अमृता यांचा सामना विशेष रंगला; दुसऱ्या गेममध्ये 29-30 असा गोल्डन-पॉइंटपर्यंत गेलेला संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, ध्रुव कपिला-तनिषा क्रास्टो या 15व्या मानांकित भारतीय जोडीचे आव्हान अजून कायम आहे. पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर ही जोडी दुसऱ्या फेरीत मकाऊच्या लिआंग लोक चोंग-वेंग चो एनजी जोडीशी भिडणार आहे. 17 ते 23 ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये ही 30वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होत असून, घरच्या मैदानावर भारतीय खेळाडूंकडून पदकाची मोठी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >