Friday, August 14, 2026

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप तीन जण बेपत्ता आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. बोगद्यात झालेल्या पडझडीमुळे संकटात सापडलेल्यांपैकी १२ जणांची सुरक्षित सुटका करण्यात यश मिळाले आहे. NDRF आणि SDRF तसेच राज्य पोलीस, CISF, ITBP आणि जिल्हा प्रशासन मदतकार्य करत आहे.

ज्यावेळी पडझड सुरू झाली त्यावेळी बोगद्यात अधिकारी-कर्मचारी असे एकूण २२ जण होते. त्यापैकी १२ जणांना वाचवले आहे. सात जणांचा मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह पण बोगद्याबाहेर आणले आहेत. आता सततच्या पावसामुळे आणि बोगद्यातील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.

जलविद्युत प्रकल्पासाठी तयार होत असलेल्या बोगद्याची सध्याची एकूण लांबी अडीच किलोमीटर एवढी आहे. या बोगद्यात सुमारे सहा फूट उंचीपर्यंत पाणी शिरले आहे. पाण्याचा वेगवान प्रवाह आणि ऑक्सिजनची कमी झालेली पातळी तसेच भूस्खलनाचा धोका यामुळे मदतकार्याचा वेग मंदावला आहे. सुरक्षेची खबरदारी घेऊन मदतकार्य सुरू आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चमोली येथील बोगद्यातील दुर्घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

बोगद्यातील पूरस्थितीमुळे बचाव पथकांसमोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे, पाणी आणि साचलेल्या गाळामुळे हालचालींवर निर्बंध आले असून शोध घेणे अवघड झाले आहे. बोगद्यातील परिस्थितीचा आढावा घेत बचाव पथके आळीपाळीने शोधकार्य सुरू ठेवत आहेत. बेपत्ता असलेल्या तीन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पथके पाण्याने भरलेल्या भागात हाताने शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. अपघातस्थळी शोधकार्य सुरू असताना, या मोहिमेत सहभागी असलेल्या यंत्रणांमध्ये अधिकारी समन्वय साधत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >