मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणखी 22 उपनगरीय लोकल गाड्यांचे 12 डब्यांवरून 15 डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून या गाड्या 15 डब्यांसह धावणार असून, प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे 25 टक्क्यांनी वाढणार आहे. या निर्णयाचा विशेष फायदा अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. (Mumbai Local)
या श्रेणीवर्धनानंतर मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकल सेवांची संख्या 32 वरून 54 होणार आहे. नव्याने 15 डब्यांच्या करण्यात येणाऱ्या 22 सेवांपैकी 11 सेवा गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. यामध्ये सीएसएमटी-कर्जत आणि खोपोली-कर्जत मार्गावरील लोकलचा समावेश आहे.
गर्दीच्या वेळेतील महत्त्वाच्या सेवांमध्ये सकाळी 8.27 वाजता धावणारी अंबरनाथ-सीएसएमटी लोकल आणि सकाळी 10 वाजताची खोपोली-कर्जत लोकल 15 डब्यांची होणार आहे. तसेच सायंकाळी 7.42 वाजताची सीएसएमटी-अंबरनाथ आणि 7.50 वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकलही 15 डब्यांसह धावणार आहे.
दरम्यान, 15 डब्यांच्या रेकमुळे काही विद्यमान सेवांच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहेत. खोपोली-परेल सेवा दादरपर्यंत, तर सीएसएमटी-अंबरनाथ सेवाही दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांची एकूण संख्या 1,820 इतकीच राहणार आहे. (Central railway)
मध्य रेल्वेने टप्प्याटप्प्याने 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. पहिली 15 डब्यांची लोकल 16 ऑक्टोबर 2012 रोजी सुरू झाली होती. त्यानंतर एप्रिल 2019 मध्ये सहा आणि 20 जुलै 2026 रोजी आणखी 10 सेवांचे श्रेणीवर्धन करण्यात आले. आता आणखी 22 सेवांची भर पडल्याने मुख्य मार्गावरील प्रवाशांना वाढीव प्रवासी क्षमता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त लोकल न वाढवता सध्याच्या सेवांमधूनच अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.