Friday, August 7, 2026

MISSING PERSON : "पप्पा घरी कधी येणार?" ५ महिन्यांपासून मुंबईतून गायब झालेल्या चंदनच्या कुटुंबाची आजही प्रतीक्षा!

MISSING PERSON :

मुंबई: "पप्पा घरी कधी येणार?" हा एकच प्रश्न विचारणारी दोन लहान मुलं, दरवाज्याकडे डोळे लावून बसलेली हतबल आई आणि पतीच्या परतण्याच्या अपेक्षेत रोज रात्री जागून काढणारी पत्नी... ही कहाणी आहे मुंबईतून रहस्यामयरित्या गायब झालेल्या ३६ वर्षीय चंदन कुमार राम याच्या दुःखी कुटुंबाची. पाच महिने लोटले तरीही चंदनचा काहीही पत्ता लागलेला नाही, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन येथील हरसिंगपूर गावा,णारा चंदन कुमार राम हा कुटुंबातील कर्ता आणि मोठा मुलगा होता. नोकरीच्या शोधात तो आपल्या गावावरून मुंबईत आला होता. घरातून निघताना तो लवकरच परत येईल, असे वचन देऊन गेला होता. मात्र, ९ मार्च २०२६ रोजी मुंबईच्या पोगाव भागातून चंदन अचानक बेपत्ता झाला. तेव्हापासून त्याचा मोबाईल नंबर सतत बंद येत असून, त्याने ना कुणाला फोन केला, ना कोणतीही माहिती दिली आहे. चंदनच्या बेपत्ता होण्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत पोलिसांना किंवा कुटुंबाला अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.

कुटुंबाची वाढती व्याकुळता आणि आशा

चंदनच्या मागे त्याचे संपूर्ण कुटुंब अक्षरशः कोलमडून गेले आहे. त्याची वृद्ध आई रोज सकाळी सूर्यदेवाकडे मुलगा सुखरुप परत यावा म्हणून प्रार्थना करते. तिचा आपल्या मुलाच्या जिवंत असण्यावर आणि परतण्यावर ठाम विश्वास आहे. दुसरीकडे, चंदनची पत्नी निर्मला ही पती उद्या नक्की येईल, या अंधुक आशेवर आपले दिवस ढकलत आहे.

परंतु, या कुटुंबातील सर्वात हृदयद्रावक चित्र म्हणजे त्यांची दोन लहान मुलं. पाच वर्षांची मुलगी अनुष्का आणि अडीच वर्षांचा मुलगा आरव सतत "पप्पा कधी येणार?" असा प्रश्न विचारतात. लहान मुलांच्या या निष्पाप प्रश्नावर निर्मला यांच्या डोळ्यात कायम अश्रू येतात, कारण त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याची हिंमत कुणातही उरलेली नाही.

नातेवाईकांचे आणि गावकऱ्यांचे आवाहन

चंदनने मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या कोणाशीही संपर्क साधलेला नाही. गावातील लोकही या कठीण काळात कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत. चंदनबाबत कोणतीही माहिती किंवा सुगावा लागल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे भावनिक आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. मुंबईसारख्या महानगरात आलेल्या एका तरुणाचे अशाप्रकारे अचानक गायब होणे आणि पाच महिने उलटूनही त्याचा शोध न लागणे, हे या संपूर्ण प्रकरणातील मोठे गूढ बनले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >