महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि सुलभपणे चालता यावे यासाठी आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटी, व्यावसायिकांनी पदपथांवर अनधिकृतपणे उभारलेले उतरंडीचे मार्ग (रॅम्प), अतिक्रमणे, व्यावसायिक बांधकामे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपाचे अडथळे खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या गृहनिर्माण सोसायटी तसेच गाळेधारकांनी पदपथांवर उतरंडीचे मार्ग (रॅम्प) अथवा अन्य स्वरुपाचे अतिक्रमण केले आहे, त्यांनी ते एक महिन्याच्या आत स्वखर्चाने काढून टाकावेत. अन्यथा, महानगरपालिकेकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे इशारा वजा आवाहन महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे. (Mumbai News)
स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून या मंंड्यांचा विकास त्वरीत व्हावा ...
पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान मुंबई प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील विले पार्ले परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग, राम गणेश गडकरी मार्ग, बंडू गोरे मार्ग, गोरेगाव रेल्वे स्थानक मार्ग, शेठ श्री देवराजजी गुंदेचा चौक, गोरेगाव स्टेशनजवळील टोमॅटो गल्ली, दूध सागर मार्ग आदी परिसराची गुरुवारी ६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. पदपथांवरील अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालता यावे, यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्त आश्विनी भिडे यांनी या पाहणी दौऱ्यात दिले आहेत. यावेळी सह आयुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते. (Mumbai Footpath)
आयुक्त भिडे यांनी पदपथांवरील अतिक्रमणे, रॅम्प, व्यावसायिक बांधकामे तसेच नागरिकांच्या पादचारी मार्गात येणारे अन्य अडथळे यांचा आढावा घेतला. पदपथांची उपलब्ध जागा पूर्णपणे नागरिकांच्या वापरासाठी खुली करून देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Public Safety)
‘के पश्चिम’ विभागात 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालत यावे यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच के पश्चिम विभागातील एकूण ३५५ मार्गांपैकी २७ मार्ग हाती घेण्यात आले आहेत. या २७ मार्गांवरील ३७.७ किलोमीटर अंतराइतके पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत. ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागांतील पदपथांवर गृहनिर्माण संस्थांकडून अथवा गाळेधारकांकडून त्यांच्या वाहनांच्या ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेले रॅम्प अनेक ठिकाणी नागरिकांच्या चालण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना अशा अडथळ्यांमुळे पदपथ सोडून रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. ही बाब गांभीर्याने घेत आयुक्त श्रीमती भिडे यांनी अशा प्रकारचे रॅम्प तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले. संबंधितांनी एक महिन्याच्या आत स्वतःहून अशी अतिक्रमणे काढून पदपथ पूर्ववत करावेत. मात्र या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले आहे. यासह पदपथांवर काही ठिकाणी व्यावसायिकांचे स्टॉल्सही आहेत. त्यांचा रहदारीला अडथळा निर्माण होतो. या स्टॉल्सधारकांनाही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ( Footpath Encroachment)





