Wednesday, August 26, 2026

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सूबेदारगंज दरम्यान धावणारी विशेष ट्रेन आता अधिकृतपणे 'अमृत भारत एक्सप्रेस'मध्ये श्रेणीसुधारित (अपग्रेड) करून नियमित सेवेत रूपांतरित केली आहे. अल्प-उत्पन्न गट, मध्यमवर्गीय आणि सामान्य प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही वातानुकूलित नसलेली नवीन एक्सप्रेस अत्यंत कमी दरात आधुनिकतेचा अनुभव आणि उच्च दर्जाची सुरक्षा देणारी ठरणार आहे. पूर्वी ही सेवा विशेष गाडी स्वरूपात चालवली जात होती. मात्र, आता सुधारित क्रमांकासह ही साप्ताहिक नियमित सेवा प्रवाशांसाठी धावणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १४१२२ ही अमृत भारत एक्सप्रेस दिनांक २८ ऑगस्ट २०२६ पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री २२.५५ वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०७.३० वाजता सूबेदारगंज येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी, गाडी क्रमांक १४१२१ ही दिनांक २७ ऑगस्ट २०२६ पासून दर गुरुवारी सूबेदारगंज येथून दुपारी १२.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुखरूप परत येईल. या प्रवासादरम्यान ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूट धाम, बाँदा, रागौल, भरुआसुमेरपुर, गोविन्दपुरी आणि फतेहपुर या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. या संपूर्ण मार्गावरील प्रवाशांना या जोडणीमुळे मोठा दिलासा मिळणार असून लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

'Amrit Bharat Express'

आधुनिक रचना आणि उच्च क्षमता

या २२ डब्यांच्या नव्या अमृत भारत ट्रेनची रचना विशेष करून उच्च क्षमता आणि बजेट-अनुकूल प्रवासासाठी करण्यात आली आहे. यात एकूण २२ अमृत भारत डब्यांचा समावेश असून, त्यामध्ये ८ शयनयान (स्लीपर), ११ सामान्य श्रेणीचे (जनरल) डबे, १ पॅन्ट्री कार आणि २ लगेज-कम-दिव्यांगजन ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. जास्तीत जास्त आसनक्षमता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेली ही गाडी प्रत्येक फेरीत १८०० पेक्षा अधिक प्रवाशांची ने-आण करण्यास सक्षम आहे. यामुळे सण-उत्सव किंवा गर्दीच्या काळात प्रवाशांना होणारा त्रास टळणार आहे.

सामान्य तिकिटांच्या दरात प्रीमियम सुविधा

या नवीन ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. 'पुश-पूल' तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे गाडीचा वेग वाढताना किंवा ब्रेक लागताना कोणताही तीव्र झटका बसत नाही, परिणामी प्रवासाचा वेळ वाचतो आणि प्रवाशांचा शारीरिक थकवा मोठ्या प्रमाणावर कमी होतो. डब्यांच्या आत शरीरशास्त्रानुसार (एर्गोनॉमिकली) डिझाइन केलेल्या आकर्षक जागा आणि बर्थची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, तेजस्वी एलईडी दिवे, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही पाळत यंत्रणा आणि स्वयंचलित उद्घोषणा व प्रवासी माहिती प्रणाली बसवण्यात आली आहे.

स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही गाडी अत्यंत प्रगत आहे. डब्यांदरम्यान सुरक्षित हालचालीसाठी 'सील्ड वेस्टिब्युल्स', आधुनिक 'व्हॅक्यूम-इव्हॅक्युएशन' प्रणाली आणि स्वयंचलित दुर्गंधी नियंत्रण यंत्रनेसह दिव्यांग-स्नेही शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, रेल्वे सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी यात 'कवच' स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली, आग-प्रतिरोधक पडदे आणि अत्याधुनिक एरोसोल आग विझवण्याचे तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे.

या नव्या समावेशानंतर आता मध्य रेल्वेवर एकूण २० 'अमृत भारत' गाड्या यशस्वीपणे धावत आहेत. यापैकी तब्बल १४ गाड्या या थेट मध्य रेल्वेवरून सुटतात किंवा तिथे शॉर्ट टर्मिनेट होतात, ज्यामुळे देशभरात सुलभ आणि दर्जेदार रेल्वे प्रवासासाठी मध्य रेल्वेची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. या गाडीचे आरक्षण सुरू झाले असून, प्रवासी अधिकृत आयआरसीटीसी द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात किंवा अनारक्षित तिकिटांसाठी रेलवन ॲपचा वापर करू शकतात. गाड्यांच्या थांब्याबाबत व वेळापत्रकाबाबत सविस्तर माहितीसाठी भारतीय रेल्वे पूछताछ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >