Thursday, July 30, 2026

Nashik MHADA Scam : 20 वर्षांपूर्वीच्या नोंदींचा फास; दोघा मंडल अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

Nashik MHADA Scam : 20 वर्षांपूर्वीच्या नोंदींचा फास; दोघा मंडल अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

Nashik MHADA Scam : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळ्यात विशेष तपास पथकाच्या कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले मंडल अधिकारी दिलीप कचरू वामन आणि सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांना न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करता इतर संशयितांशी संगनमत करून फेरफार नोंदी मंजूर केल्या. बनावट मोजणी नकाशांच्या आधारे सातबारा उताऱ्यांमध्ये फेरफार करत खातेफोडीच्या नोंदी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Nashik Crime News )

20 वर्षांपूर्वीच्या नोंदींचा फास

राज्य शासनाच्या २०१३ च्या धोरणानुसार, एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या गृहप्रकल्पांमध्ये २० टक्के जागा म्हाडासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही बांधकाम व्यावसायिकांनी बनावट नकाशांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे 'एसआयटी'च्या तपासात निष्पन्न झाले आहे. या तपासादरम्यान अशा ४९ संशयास्पद प्रकरणांचा उलगडा झाला होता. या घोटाळ्यात यापूर्वी दिनेश कन्हैय्यालाल उर्फ सोनू मनवानी, दीपक भगवानदास करमचंदानी, नितीन पाटील, बिपीन काजळे, कल्पेश पाटील आणि श्रीकांत परदेशी यांना अटक करण्यात आली होती. आता महसूल विभागातील आणखी दोन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे. (Nashik Crime News )

संगनमत करून चुकीच्या फेरफार नोंदी

चौकशीत भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म क्रमांक १२, गटबुक तसेच जुन्या पत्रव्यवहाराची नियमानुसार पडताळणी करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाचे आदेश किंवा अधिकृत पत्र नसतानाही बांधकाम व्यावसायिक, जमीनमालक आणि गुंतवणूकदारांशी संगनमत करून चुकीच्या फेरफार नोंदी प्रमाणित करण्यात आल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे १४ गटांतील फेरफार मंजूर करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. (Nashik Crime News )

व्यवहार बनावट पद्धतीने उभे केल्याचा संशय

सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २० वर्षांपूर्वीचे जमीन व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे उभे करण्यात आले. खातेफोड आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार खरे असल्याचा आभास निर्माण करून त्यावर फेरफार नोंदी मंजूर करण्यात आल्या. या व्यवहारांची योग्य शहानिशा न करताच मंडल अधिकाऱ्यांनी नोंदींना मंजुरी दिल्याचा संशय असून, या प्रकरणात महसूल विभागातील आणखी काही अधिकारी आणि कर्मचारी तपास पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Nashik Crime News )

दरम्यान, महसूल विभागातील आणखी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असून, त्यांच्याविरोधातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट-१चे प्रभारी पोलीस निरीक्षक कांचन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा