Thursday, July 30, 2026

CM Devendra Fadnavis : भारताला आतून पोकळ करण्यासाठी छुपे युद्ध सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis : भारताला आतून पोकळ करण्यासाठी छुपे युद्ध सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरूणाईची दिशा भरकटवण्यासाठी व्यसनांध करण्याचे षड्यंत्र

मुंबई : संरक्षण, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत असतानाच, देशाला लढाईत पराभूत करणे शक्य नसल्याने आता शत्रू राष्ट्रांकडून भारताला आतून पोकळ करण्यासाठी एक छुपे युद्ध सुरू करण्यात आले आहे. या षड्यंत्राचा भाग म्हणून देशातील अफाट युवा शक्तीला अमली पदार्थांच्या (Drugs) जाळ्यात ओढून त्यांची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी केला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘ड्रग्ज फ्री मुंबई अभियान २०२६’ चा शुभारंभ गुरुवारी वरळी येथील एनएससीआय सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम (डोम) येथे पार पडला. या वेळी हजारो शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्जमुक्त समाजाची शपथ दिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला असून, त्या दृष्टीने मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे," असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "भारत आज जगात चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. अवकाशात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा अमेरिकेनंतरचा एकमेव देश ठरला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) असो वा आधुनिक तंत्रज्ञान, भारत अग्रस्थानी आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने आपली संरक्षण क्षेत्रातील ताकद जगाला दाखवून दिली आहे."

"सध्या जगात सर्वाधिक तरुणाई भारताकडे आहे आणि ही युवा शक्ती देशाचे भविष्य उज्वल करू शकते. हेच शत्रू राष्ट्रांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच तरुणाईला व्यसनाधीन करून देश आतून पोकळ करायचा, असा नवा पॅटर्न आणि छुपे युद्ध सुरू झाले आहे. या षड्यंत्राचे मुख्य शस्त्र अमली पदार्थ हेच आहे," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सामायिक लढा उभारण्याचे आवाहन

- दुर्देवाने या आंतरराष्ट्रीय षड्यंत्रात देशातील काही अंतर्गत घटक पैशांच्या हव्यासापोटी सामील झाले आहेत, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामायिक युद्ध पुकारण्याचे आवाहन केले. "अमली पदार्थांचे वितरण आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कठोर कारवाई करेलच. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये किंवा दर्ग्यांच्या आसपास अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांना तुरुंगात धाडण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत मुंबई पूर्णपणे ड्रग्जमुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे," असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

- "वयाच्या २१ ते २२ वर्षांपर्यंत जर आपण कोणत्याही व्यसनापासून दूर राहिलो, तर आयुष्यात कधीच त्या वाटेला जात नाही. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता 'नाही' म्हणायला शिकले पाहिजे. कोणी जर 'यामध्ये मजा येते' असे सांगत असेल, तर 'ही मजा नाही, तर आयुष्य उद्ध्वस्त करणारी सजा आहे' हे सांगता आले पाहिजे," असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >