Wednesday, July 29, 2026

Pandharpur Flood : पंढरीत पुराचा विळखा! चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली

Pandharpur Flood : पंढरीत पुराचा विळखा! चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली

पंढरपूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने भीमा-चंद्रभागा नदीला पूर आला आहे. मंगळवारी (२८ जुलै) उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होताच चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीची पातळी झपाट्याने वाढल्याने पंढरपूरातील ऐतिहासिक जुना दगडी पूल आणि तालुक्यातील नदीवरील आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.(pandharpur)

उजनी धरणातून सुमारे ६१ हजार क्युसेक (cusec), तर वीर धरणातून (Veer Dam) जवळपास ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या वाढलेल्या प्रवाहामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, चंद्रभागा नदीच्या पात्रातील अनेक लहान मंदिरांना पाण्याचा वेढा पडला असून सर्व घाटांपर्यंत पाणी पोहोचले आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने नदीपात्रात जाण्यास बंदी घातली आहे. सर्व प्रमुख घाटांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून नागरिकांना नदीपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूराचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. नदीवरील सर्व आठ बंधारे पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहरातील अंबाबाई पटांगण, व्यास नारायण परिसरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.पटवर्धन कुरोली परिसरातही पुराचा मोठा परिणाम दिसून आला आहे. पिराची कुरोली येथील बंधाऱ्यावर पाणी आल्याने पटवर्धन कुरोली गावाचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी दुपारपासून बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वाहतूक बंद केली. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >