Tuesday, July 28, 2026

धोंडीबा

धोंडीबा

आमच्या संगमनेरहून गाडीने अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या सिन्नर या तालुक्यात, एमआयडीसी भागात, एक ‘गारगोटी’ नावाचे संग्रहालय आहे. के. सी. पांडे नावाच्या माणसाच्या अथक प्रयत्नांमधून व चिकाटीतून हे अत्यंत चकित करून टाकणारे व डोळ्यांचे पारणे फेडणारे संग्रहालय, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पहावे असेच आहे. आपल्या भूमातेच्या गर्भात दडलेला हा खजिना अतिशय कलात्मक पद्धतीने आपल्याला दाखविला जातो. सात-आठ वर्षांनी पुन्हा एकदा भेट दिली तरी तितकाच आनंद पुन्हा मिळतो. त्या खजिन्याविषयी मी शब्दांत लिहू शकत नाही कारण ते प्रत्यक्ष पाहूनच अनुभवावे लागते. आम्ही ते दोनदा पाहिले. पण तेव्हापासून दगडाला दगड म्हणण्याऐवजी प्रेमाने व आदराने 'धोंडीबा' म्हणावे असे वाटायला लागले.

लहानपणी अनेक मुला-मुलींना शंख-शिंपले, रंगीत दगड, मणी वगैरे गोळा करण्याचा नाद असतो तसा माझ्या मुलांनाही होताच. कुठेही नदीकाठी, डोंगरावर, समुद्रावर किंवा कुठल्या विशिष्ट भूप्रदेशात उदाहरणार्थ, राजस्थानातील जैसलमेर, डुंगरपुर, उत्तरेस हरिद्वार- ऋषिकेश, कर्नाटकात हम्पी-बदामी, महाराष्ट्रात अजिंठा-वेरूळ, गुजरातेत द्वारका तर नॉर्थ ईस्टला जगन्नाथपुरी किंवा कोणार्क इ. प्रत्येक ठिकाणचा दगड वेगळ्याच रंगाचा. कुठेही पर्यटनाला गेलो की पिशवीभर दगड मुले घरात आणत. असा वर्षभरात गच्चीवर रंगबिरंगी दगडांचा एक छोटा डोंगर तयार होई. बिचारे परत उन्हा-पावसातच असत. काही अतिवैशिष्ट्यपूर्ण दगड मात्र घरातील शोकेसमध्ये स्थानापन्न होत. गच्चीवरील साठा मी अनेकवेळा वैतागून फेकून देत असे. काही अतिसुंदर दगड भेट म्हणून मिळत तेही शोकेसमध्ये ठेवले जात. उदाहरणार्थ, अंदमानच्या समुद्रातील कोरल्स वगैरे...

मुलं लहान असताना समोरच्या बंगल्यात खेळायला जायची. त्यांच्या त्या मित्राला एकदा अहमदनगर परिसरात आढळणारा ‘जांभा’ दगड मिळाला. वरून अत्यंत ओबडधोबड व रंगहीन अशा या दगडाच्या आतमध्ये मात्र सर्वात खाली पांढऱ्या स्फटिकाचे अस्तर व त्यावर गडद जांभळ्या रंगाचे तेजस्वी स्फटिक असतात. खेळता खेळता तो दगड खाली पडून फुटला व त्याचे दोन तुकडे झाले. त्या मित्राने आनंदाने एक भाग माझ्या मुलांना देऊन टाकला. तो 'जांभा' अजूनही आमच्या शोकेसमध्ये आहे. दिल्ली ते हरिद्वार या रस्त्यावर कारने आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा एका बाजूला एक कॅनॉल / नदी वाहत असते व दुसऱ्या बाजूने जमिनीवर अगदी बटाट्यासारखे दिसणारे(डिट्टो) पिवळसर, गुळगुळीत, गोल व अंडाकृती असे दगड दिसतात. ते इतके बटाट्यासारखे दिसतात की हातात घेतल्यावर त्यांच्या वजनामुळेच ते दगड आहेत हे कळते. बटाटे विकणारे खऱ्या बटाट्यांमध्ये मिसळून वजनात गद्दारी करू शकतात पण भारतातील बटाटे-विके अजूनही प्रामाणिक आहेत. बटाटेदगड डोक्यात भरलेले मात्र अनेकजण सापडतात. आम्ही तेही चार-पाच दगड घरी आणले. माझ्या मुलीने त्यावर सुंदर स्टोनपेंटिंग करून घराची शोभा वाढवली. ते पुढील अनेक पिढ्या चालतील. हे बटाटे दगड मला परत उरळीकांचन येथील निसर्गोपचार केंद्रात दिसले. त्यात विविध रंग होते व ते साधारण सारख्या आकाराचे होते. त्यांचा अर्धा भाग जमिनीत पुरून, दीड-एक फूट रुंद असा ट्रॅक केलेला आहे. त्यावर पायाच्या घोट्यापर्यंत येईल इतके पाणी असते. यावरून साधकाने चालायचे म्हणजे तळपायांचे विशिष्ट बिंदू दाबले जाऊन ॲक्युप्रेशरने मेंदूतील काही केंद्रे उद्दीपित होतात म्हणे. न जाणो डोक्यातील बटाटेपणा कमी होत असावा. मला तर हा 'बटाटेवॉक' फारच आवडला.

अनेक जणांचा अंघोळीसाठीचा एक विशिष्ट चपटा दगड वर्षानुवर्षे असतो. महात्मा गांधी असा दगड वापरत असत हे मी वाचलेले आहे. म्हणूनच दगडाला केवळ भौगोलिक नव्हे तर ऐतिहासिक महत्त्वही आहेच. आमच्या लहानपणी एकत्र कुटुंब पद्धतीत साबणाची काटकसर असायची. हिवाळ्यात मुले बाहेर उन्हात व मातीत खेळत तेव्हा त्यांचे हातपाय, गाल खूपच उलत. दुपारच्या वेळी गच्चीत सावलीत बसून हळूहळू एखादा चपटा दगड उललेल्या भागावर फिरवला जायचा व कोमट पाण्याने तो भाग धुतला जायचा. मग आई किंवा आजी हळुवारपणे त्यावर कोमट खोबरेल तेलाचा हात फिरवायच्या हे आठवल्याशिवाय राहत नाही. हल्लीच्या लहान मुलांना हातपाय उलणे म्हणजे काय हे माहीतच नाही. त्यांचा क्वचितच मातीशी संबंध येतो. शिवाय त्यांच्या नॉर्मल त्वचेलाही आया कसली कसली तेलं व क्रीम चोपडतात. त्यामुळे ती मुलं नेहमी लोण्यासारखी मऊ असतात मात्र गाल उललेली छोटी बाळं किंवा मुलं आणखीनच गोड दिसतात. एकदा लहानपणी माझ्या मुलाला कोरड्या नदीपात्रात एक दगडी गणपतीची मूर्ती सापडली. कानापाशी तिचा छोटासा टवका उडालेला होता. खंडित झाला त्यामुळे नदीत कुणीतरी विसर्जित केला असावा. अत्यंत गुळगुळीत पण सुबक असा तो बाप्पा मुलाने घरी आणला व देव्हाऱ्यात ठेवला. सकाळी पूजा करताना आजीने (माझ्या सासूबाईंनी) तो पाहिला. त्यांना प्रश्न पडला की काय करावे, म्हणजे याला देव्हाऱ्यात ठेवावा की नाही...परत तोच पेच. पण नातू प्रेम जिंकले. आपल्या मुलांना अपंगत्व आल्यास आपण त्यांचा सांभाळ करतोच की या भावनेने त्यांनी तो देव्हाऱ्यातच ठेवला. अजूनही आहे. गंमत म्हणजे, रात्री मीट्ट काळोखात तो चमकतो कारण त्यात 'रेडियम' धातू आहे. आमच्याकडे कुणीही छोटी मुलं राहायला आली की आम्ही रात्री त्यांना ही गंमत दाखवतो. निसर्ग हा एक मोठा चमत्कारच आहे.

पूर्वी धुणं धुवायचा दगड व मसाला किंवा पुरण वाटायचा पाटा-वरवंटा हा बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असे. दगडी भिंतींची घरे एसी लावल्यासारखी एकदम थंडगार असत. दगडी जात्यांनी तर बायकांची कितीतरी सुखदुःखे ऐकून लोकसाहित्य निर्माण केले. पण प्रसंगी दगडाला शेंदूर फासून देव निर्माण करणारे लोक कधी कधी रागाच्या भरात समोर असलेल्या माणसाचा डोक्यात दगड घालून खूनही करतात. जातीय किंवा धार्मिक दंगलींमध्ये दगडांचा वापर मुक्तहस्ताने केला जातो. ‘माझ्या मना बन दगड ’ ही विंदांची कविता अशावेळी आठवते. मागच्या वर्षी माझा मुलगा नेहमीप्रमाणे ट्रेकिंगला गेला तेव्हा तिथून त्याने एक अतिशय सुंदर पिवळ्या रंगाचा, खूप नाजूक रेषा-रेषा किंवा पापुद्रे असलेला छोटासा दगड आणला आहे. आम्ही तो पाहून खूपच हरखून गेलो आहोत.तो वजनाने दगडासारखा जड नव्हे तर हलका आहे. माझ्या मुलीने लगेच गुगल वरुनसर्च केले व ती म्हणाली," हा दगड नाही. हे फॉसिल आहे. कदाचित ते खूप मौल्यवान असू शकते. एखाद्या पुरातत्त्व खात्याच्या अभ्यासकाला दाखवायला हवे." मग मी व माझ्या मुलाने त्या दगड अथवा फॉसीलचे आपल्याला करोड-दोन करोड रुपये मिळाल्यास काय काय करायचे हे ठरवून टाकले.

___सीमा मालाणी
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा