Sunday, July 26, 2026

Eknath Shinde:  'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान राज्यभर राबवणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde:  'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान राज्यभर राबवणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण या तीन मुद्द्यांवर भर देत 'शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे' हे अभियान राज्यभर राबविण्याची घोषणा केली. मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शासनाच्या योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Shivsena)

शिंदे म्हणाले की, 'शासन आपल्या दारी' उपक्रमानंतर आता 'शिवसेना जनतेच्या दारी' अभियानाद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवला जाणार आहे. या उपक्रमातून एका दिवसात 20 हजारांहून अधिक नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Ramdas Kadam)

युवकांशी संवाद साधताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्टार्टअप, इनोव्हेशन आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नवीन संधींचा लाभ घेत स्वतःच्या कौशल्याचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला.

2022 नंतरच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, सरकारचा भर सत्तेवर नसून विकासकामांवर आहे. शेतकरी, महिला, युवक, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध निर्णय घेतले जात असून जनतेची सेवा हेच सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवसैनिकांनी गावागावात जाऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Maharashtra Government)

कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दापोली येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केली. त्यासंदर्भातील शासन निर्णयही त्यांनी कार्यक्रमात सुपूर्द केला. ( Shiv Sena Janatechya Dari)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचेही शिंदे यांनी कौतुक केले. एका दिवसात हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्याबरोबरच 250 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. (Politics News)

यावेळी राज्यभर 'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान राबविण्याबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत 450 कोटी रुपयांच्या स्वच्छता यंत्रसामग्री उपक्रमाची आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची घोषणाही करण्यात आली.

या कार्यक्रमाला रामदास कदम, गजानन कीर्तिकर, सिद्धेश कदम, शीतल म्हात्रे, सचिन अहिर, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, प्रकाश सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >