मनस्विनी-पूर्णिमा शिंदे आपला भारत देश परंपरा आणि संस्कृतीने नटलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला संत-महंतांच्या समृद्ध परंपरेचा लाभ झाला आहे. मराठी भाषा ही अमृताशी पैज जिंकणारी भाषा मानली जाते. या भाषेतील साहित्यप्रकारांमध्ये कीर्तन ही कला धर्म, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा अमूल्य वारसा जपणारी आहे. भजन, चिंतन, नामस्मरण, भक्ती आणि प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम म्हणजे कीर्तन. त्यात मनोरंजन असले तरी त्या मनोरंजनातून समाजप्रबोधन घडणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच कीर्तन ही एक अनन्यसाधारण कला असून तिचा सातत्याने अभ्यास करावा लागतो.कीर्तनकाराने स्वतःचे विचार विवेकी, परिपक्व आणि प्रगल्भ बनविणे आवश्यक असते. त्याच्याकडे उत्तम बुद्धिमत्ता, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, उत्साह आणि चैतन्य निर्माण करण्याची क्षमता असावी लागते. जशी कोणतीही कला शिकण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो, तशीच तयारी कीर्तनासाठीही करावी लागते.
समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून कीर्तनाकडे पाहिले जाते. या कलेचा थेट संबंध सामान्य माणसाशी येतो. तळागाळातील प्रत्येक स्तरापर्यंत संत परंपरेचे विचार पोहोचविण्याचे कार्य कीर्तनाद्वारे सातत्याने घडत आले आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाभलेले सर्वात मोठे योगदान म्हणजे संत परंपरा. विवेक, समता आणि भक्तीचा हा अमूल्य ठेवा आहे. पुस्तकातील प्रमाणभाषेतील विचार जेव्हा बोलीभाषेत लय, ताल, सूर, नाद, चाल, गीत, अभिनय, विनोद आणि भावभक्तीच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जातात, तेव्हा त्याला कीर्तन म्हणतात.उत्तम कीर्तनकार होण्यासाठी साहित्याचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. त्याचबरोबर उत्कृष्ट पाठांतर, दृष्टांत, दाखले, कथा, काव्य, अभंग, ओव्या, सुविचार, सुभाषिते, संस्कृत वचने, अनुभवसंपदा आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असतो. प्रभावी कथाकथन ही कीर्तनाची मोठी ताकद आहे. अनेक कीर्तनकार स्वतःच्या अनुभवांबरोबरच सामाजिक जीवनातील प्रसंग नाट्यरूपाने सादर करून श्रोत्यांपर्यंत संदेश पोहोचवतात.कीर्तनामध्ये नृत्यालाही महत्त्वाचे स्थान आहे. गाण्यात जशी भक्ती आहे, तशीच नृत्यातूनही भक्तिभाव व्यक्त होतो. अनेक भक्ती संप्रदायांत नृत्याला मर्यादा असल्या तरी कीर्तनात भक्तिभावाने केलेले नृत्य मान्य आहे. म्हणूनच संतांनी म्हटले आहे—“नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.”शिवी सहज आठवते; परंतु ओवी लक्षात ठेवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणूनच संतांनी अनुभवाला महत्त्व दिले आहे. “अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास” आणि म्हणूनच म्हणतात —“एक तरी ओवी अनुभवावी.”आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गाडवोगावी, वाड्या-वस्त्यांवर धार्मिक सप्ताहांचे आयोजन केले जाते. श्रावण, अधिक मास, रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी अशा विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने सात दिवस अखंड कीर्तनाचा सोहळा रंगतो. या सोहळ्याला सप्ताह म्हणतात. सप्ताहाचा शेवटचा दिवस काल्याचे कीर्तन म्हणून विशेष महत्त्वाचा असतो. गोपिका, गवळणी, कान्हा, पेंद्या आणि इतर सवंगडी यांच्या सहभागातून श्रीकृष्णाच्या लीलांचे सुंदर चित्र उभे राहते. सर्वजण भक्तिभावाने नाचतात, गातात आणि भजनात तल्लीन होतात. त्या वातावरणात माऊलीचे अस्तित्व प्रत्येकाला जाणवते. म्हणूनच वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, आलिंगन देतात आणि प्रेमाने एकमेकांना भेटतात.काल्याच्या वेळी सर्व वारकरी एकत्र येऊन लाह्या, दही आणि इतर पदार्थांचा प्रसाद तयार करतात. हा प्रसाद सर्वांना समानतेने वाटला जातो. दहीहंडी फोडून एकत्र केलेला काला हा ऐक्य, समता, प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. भक्तिभावाने, प्रेमाने आणि समतेच्या भावनेने वाटला जाणारा काला हा आनंदाचा उत्सव असतो. त्यातून कीर्तनाचे सार्थक होते आणि सप्ताहाचा समारोपही अत्यंत मंगल वातावरणात होतो.कीर्तन ही केवळ धार्मिक परंपरा नाही; तर इतिहास, संस्कृती, लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणारे प्रभावी समाजमाध्यम आहे. वारकरी संप्रदाय हा वसा आणि वारसा पिढ्यान पिढ्या जतन, संवर्धन आणि संक्रमण करत आला आहे. संत परंपरेची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देणारी आणि अचंबित करणारी आहे.संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई, समर्थ रामदास आणि अनेक संतांनी दिलेला विचारांचा ठेवा आजही तितकाच प्रेरणादायी आहे. म्हणूनच संतवाङ्मयाबद्दल म्हटले जाते -“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.” सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून, गावच्या मातीतून आणि प्रत्येकाच्या रक्तातून वाहणाऱ्या भावभक्तीचा संगम म्हणजे कीर्तन. नैतिक मूल्ये, संत परंपरा, विवेक आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ म्हणजे कीर्तन. राष्ट्र उभारणीसाठी आणि सुसंस्कारित समाजनिर्मितीसाठी ही कला आजही अत्यंत आवश्यक आहे.ज्याप्रमाणे बहिणाबाईंच्या कविता, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकोबांचे अभंग, कबिरांचे दोहे, समर्थांचे श्लोक आणि आचार्य विनोबा भावे यांची गीताई पुन्हा पुन्हा वाचावी, समजून घ्यावी आणि जोपासावी लागते, त्याचप्रमाणे कीर्तन परंपरेचेही जतन केले पाहिजे.पंढरपूरच्या वारीत सहभागी होणारे वारकरी भजन, पूजन आणि नामस्मरणात तल्लीन होतात. अनवाणी पायांनी चालताना फोड येतात, कष्ट होतात; पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कधीच कमी होत नाही. मिळेल तिथे राहणे, मिळेल ते खाणे आणि विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी अखंड चालत राहणे, हाच त्यांचा ध्यास असतो. म्हणूनच संतांची ही ओळ आजही प्रत्येकाला प्रेरणा देते — “नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.”






