ललित-माधवी मसुरकर अजूनही ती आठवण आली की भीतीने शहारा येतो. अंगावर… काही क्षणांसाठी मी चिडीचूप होते. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. २६ जुलै २००५. तो दिवस, ती रात्र आणि निसर्गाचे ते अक्राळविक्राळ रूप... मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत आणि माझ्यासाठी तर तो एक पुनर्जन्मच होता! आकाश फाटलं होतं. सोसाट्याचा वादळी वारा, विजांचा कडकडाट, पातळीच्या सर्व मर्यादा ओलांडून अविश्रांत जोरदार कोसळणारा पाऊस, संध्याकाळी ५ वाजताच झालेला काळाकुट्ट अंधार आणि बसमध्ये पाणी चढल्यामुळे बसच्या टपावर महत्प्रयासाने स्थानिक लोकांच्या मदतीने टपावर चढलेले आम्ही प्रवासी. बसच्या टपावर भीतीने थरथरत, पावसात भिजत, थंडीने कुडकुडत होतो आम्ही. डोळ्यांसमोर फक्त अंधार आणि मृत्यू दिसत होता. रात्री दीड वाजला तरी परिस्थितीत काहीच बदल होत नव्हता. पाण्याची पातळी वाढतच होती. वरून धो-धो कोसळणारा पाऊस, खाली समुद्रासारखा उसळणारा तब्बल १४ फूट पाण्याचा थरारक प्रवाह.मृत्यू क्षणाक्षणाला आपल्या जवळ येतोय की काय या भीतीने अंग अजूनच गारठत होते. कंप सुटला होता सर्वांगाला. घरच्यांच्या आठवणीने जीव अजूनच कासावीस होत होता. रडायला येत नव्हते कारण अश्रू पण थिजले होते.जेव्हा निसर्ग असं अक्राळविक्राळ रूप धारण करतो, तेव्हा महाकाय व्यवस्था, प्रशासन आणि सरकारची मर्यादा स्पष्ट होते. अशा अस्मानी संकटात सरकारकडून मदतीची अपेक्षा करणेच व्यर्थ ठरते. कारण ज्या यंत्रणेवर आपण विसंबून असतो, ती स्वतःच त्या निसर्गप्रकोपासमोर हतबल झालेली असते. पण निसर्गाच्या या महाविनाशक शक्तीसमोर जेव्हा शासकीय व्यवस्था गुडघे टेकते, तेव्हा उभी राहते ती ‘माणुसकीची अदृश्य यंत्रणा’!आता दोन इंच जरी पाणी वाढले, तर बस बुडणार आणि मृत्यू आपल्याला गिळणार हे ठरलेले. अशा जीवघेण्या परिस्थितीत देवदूत बनून धावून आले ते बेस्टचे कर्मचारी आणि कुर्ला येथील स्थानिक रहिवासी! तिथे कोण हिंदू होतं, कोण मुसलमान, कोणालाच ठाऊक नव्हतं. जात, धर्म, पंथ सगळे काही त्या महापुरात वाहून गेले होते. पण प्रश्न असा पडतो की, स्वतःच्या जीवावर उदार होऊन इतरांसाठी धावून जाणारे हे लोक नक्की कोण असतात? आपले आणि त्यांचे काय नाते असते?
आपण त्यांना ओळखत नाही, त्यांनी आपल्याला कधी पाहिलेले नसते. तरीही स्वतःच्या लेकराबाळांचा विचार बाजूला सारून, ते मृत्यूच्या डोहात उडी घेतात. हे रूप माणसाचे नसतेच, ते त्यांच्यात जागृत झालेल्या ईश्वरी अंशाचे रूप असते. संकटाच्या क्षणी निर्माण होणारे हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते, ज्याला केवळ ‘आत्म्याचे नाते’ म्हणता येईल. ही साधी मदत नव्हती, ती मानवी मर्यादा ओलांडणारी एक असामान्य, अलौकिक कृती होती. बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक जाड दोर बांधला.कुर्ला बस डेपोसमोर बऱ्याच बसेस पाण्यात उभ्या होत्या आणि दोर बांधला होता एका डेपोपासून जवळ असलेल्या बसवर. त्या बसपर्यंत जाऊन आम्हाला दोर पकडायचा होता. पण त्या बसपर्यंत जायचे कसे.
आम्हाला एका बसवरून दुसऱ्या बसवर जाण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी दोन बसेसमध्ये आडवे राहून आपल्या शरीराचा ब्रीज बनवला होता आणि त्या मानवी ब्रीजवर म्हणजे चक्क त्या लोकांच्या पाठीवर पाय देऊन आम्हाला दुसऱ्या बसच्या टपावर जायचे होते. जरासे पाऊल बाजूला पडले तर खाली १४ फूट पाण्यात पडण्याचा धोका आणि मृत्यूला आमंत्रण होते. पण ते दिव्य आम्ही पार पाडले.आता तो दोर पकडण्यासाठी आम्हाला खाली थरकाप उडवणाऱ्या १४ फूट पाण्यात उडी मारायची होती.मी, जिला पोहायचा कोणताही सराव नव्हता, अनुभव नव्हता... तरीही त्या भयानक प्रवाहात उडी घेण्याचे अचाट धाडस मी दाखवले. मनात विचार येतो, कुठून आले असेल ते बळ? जेव्हा शरीराची आणि मनाची ताकद संपते, तेव्हा आपल्यातली कोणती ऊर्जा आपल्याला लढायला प्रवृत्त करते? कदाचित, जेव्हा मृत्यू समोर उभा असतो, तेव्हा जगण्याची जिद्द माणसाला अशक्य ते शक्य करण्याचे बळ देते. ती शक्ती माझी नव्हतीच, ती निसर्गाने किंवा त्या परमेश्वराने ऐनवेळी माझ्यात फुंकलेली शक्ती होती.
मी त्या दोराला घट्ट धरून, हवेत लटकत लटकत पुढे सरकले. तो थरार शब्दांत मांडणे अशक्य आहे! हात सुटला असता तर... हा विचारच अंगावर काटा आणतो. पण त्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आम्ही लटकत जाऊन अखेर बेस्ट कॅन्टीनचा दुसरा मजला गाठला आणि तिथे सुरक्षित पोहोचलो. ते केवळ बचाव नाट्य नव्हते…, तर विश्वाच्या एका गूढ नियोजनाचा भाग होता. कोणाची असते ही योजना? जी मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या एका जीवाला वाचवण्यासाठी अनोळखी हातांची साखळी विणते? जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा निसर्गच माणसाला माणसाचा तारणहार बनवतो. बेस्ट कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी... त्यात हिंदू-मुसलमान सर्व होते…. एकत्र येऊन उभारलेल्या त्या मानवी साखळीने मला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले. संकटाच्या त्या गडद अंधारातही माणुसकीचा दिवा तेवत असताना आम्ही पाहत होतो. तो थरार, ती भयानक रात्र आणि त्या रात्री अनुभवलेली ती खरीखुरी माणुसकी आणि ते अद्भुत नियोजन मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडे पाणी ओसरू लागल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तरीही पाण्याच्या प्रवाहाचा जोर थोडा कायम असल्यामुळे मार्गक्रमण करण्यासाठी आम्हाला पुन्हा मानवी साखळीचीच मदत घ्यावी लागली. पुढे वाटेत कित्येक लोक आम्हाला गरम खिचडी, केळी, बिस्किटे, पाणी असे घेऊन रस्त्यात उभे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला भूकच नव्हती. आदल्या दिवशीपासून उपाशी असलेले आम्ही फक्त घर कधी गाठायला मिळते आणि आपल्या प्रियजनांना कधी भेटायला मिळते या एकाच लालसेने पुढे पुढे सरकत होतो.
त्या कठीण प्रसंगात रस्त्यावर उतरून मदत करणाऱ्या त्या अनोळखी हातांकडे पाहून डोळे भरून येत होते. पोटात भुकेचा डोंब उसळला असला तरी आमचे पाय थांबत नव्हते. कारण मनातील काळजीने त्या भुकेला पार मारून टाकले होते. मोबाईलचे नेटवर्क गायब होते, घरातले सगळे कसे असतील या काळजीने जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे त्या क्षणी कोणत्याही अन्नाच्या घासापेक्षा आपल्या माणसांना घट्ट मिठी मारणे अधिक गरजेचे वाटत होते. अखेर एकदाचे घरी पोहोचलो. दारात उभ्या असलेल्या कुटुंबाच्या डोळ्यांतील अश्रू आणि आम्हाला सुखरूप पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान, यापुढे जगातील सर्व सुख कवडीमोलाची होती.२६ जुलैच्या त्या काळ्या दिवसाने निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप दाखवले, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त केले आणि मनात एक कधीही न विसरता येणारी भीती पेरली. पण त्याच महाप्रलयात मला मुंबईची खरी ताकदही पाहायला मिळाली. ती ताकद होती ‘माणुसकीची’ आणि संकटावर मात करून पुन्हा उभे राहण्याच्या ‘मुंबईकर’ वृत्तीची. तो दिवस आयुष्यातून कधीही पुसला जाणार नाही, पण त्या दिवसाने शिकवलेली नात्यांची किंमत आणि जगण्याचे मोल मी कधीच विसरणार नाही. आम्हाला मिळालेली ती मदत म्हणजे एका नि:स्वार्थी कर्माची पूजा होती!






