Tuesday, July 21, 2026

Kanpur News : टॅटूचा शौक पडला महागात! काही आठवड्यांत महिला HIV पॉझिटिव्ह; डॉक्टरांचा गंभीर इशारा

Kanpur News : टॅटूचा शौक पडला महागात! काही आठवड्यांत महिला HIV पॉझिटिव्ह; डॉक्टरांचा गंभीर इशारा

कानपूर : टॅटू काढण्याची आवड एका ३२ वर्षीय महिलेला चांगलीच महागात पडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये समोर आली आहे. दिल्लीतील एका टॅटू पार्लरमध्ये (tattoos) टॅटू काढल्यानंतर काही आठवड्यांतच महिलेची प्रकृती बिघडली. वैद्यकीय तपासणीत ती HIV पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. टॅटू काढताना वापरण्यात आलेली सुई दूषित किंवा योग्य प्रकारे निर्जंतुक न केल्यामुळे संसर्ग झाल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. (Kanpur News)

गंभीर संसर्गानंतर रुग्णालयात दाखल :

कानपूरमधील रहिवासी असलेली ही महिला काही दिवसांपूर्वी जीएसव्हीएम (Ganesh Shankar Vidyarthi Memorial) मेडिकल कॉलेजच्या त्वचारोग विभागात उपचारासाठी दाखल झाली होती. तिला गंभीर संसर्गाची तक्रार होती. तिची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी HIV आणि हेपेटायटिस-बीच्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला. चाचणी अहवाल आल्यानंतर महिला HIV बाधित असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला. (Kanpur News)

टॅटूनंतर प्रकृती बिघडली :

जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या त्वचारोग विभागातील असोसिएट प्राध्यापक डॉ. श्वेतांक यांनी सांगितले की, रुग्णाने रुग्णालयात येण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी दिल्लीतील एका टॅटू स्टुडिओमध्ये टॅटू काढला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. प्राथमिक तपासात टॅटूसाठी वापरण्यात आलेली सुई दूषित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, संसर्गाचा नेमका स्रोत निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Kanpur News)

मोफत उपचार सुरू :

महिलेची शासकीय रुग्णालयातील अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) सेंटरमध्ये नोंदणी करण्यात आली असून, तिच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, HIV पूर्णपणे बरा करणारे औषध उपलब्ध नसले, तरी नियमित औषधोपचार आणि वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण दीर्घकाळ सामान्य आयुष्य जगू शकतो. (Kanpur News)

टॅटू काढण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी :

या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, टॅटू काढताना केवळ अधिकृत आणि स्वच्छतेचे नियम पाळणाऱ्या स्टुडिओची निवड करावी. (Kanpur News)

विशेषतः खालील गोष्टींची खात्री करावी :

- प्रत्येक ग्राहकासाठी नवीन आणि निर्जंतुक सुई वापरली जात आहे का? - टॅटू कलाकार हातमोजे आणि स्वच्छ उपकरणांचा वापर करतो का? - वापरली जाणारी शाई सुरक्षित आणि दर्जेदार आहे का? - स्टुडिओमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का?

डॉक्टरांनी असेही सांगितले की, दूषित सुईमुळे HIV, हेपेटायटिस-बी आणि इतर रक्ताद्वारे पसरणाऱ्या संसर्गांचा धोका वाढू शकतो. तसेच काही रंगीत शाईमुळे त्वचेवर ॲलर्जी, सूज, लाल चट्टे आणि दीर्घकालीन दाह यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः लाल आणि हिरव्या रंगाच्या शाईमुळे त्वचेच्या प्रतिक्रिया अधिक प्रमाणात दिसून येतात. (Kanpur News)

डॉक्टरांचा सल्ला :

तज्ज्ञांच्या मते, टॅटू हा फॅशनचा भाग असला तरी तो सुरक्षित पद्धतीनेच करून घ्यावा. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी संबंधित स्टुडिओची विश्वासार्हता आणि स्वच्छतेची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. (Kanpur News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >