NCP : पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा! राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचे सुनेत्रा पवारांना पत्र

पटेल-तटकरे मुख्यमंत्री भेटीमागे हेच पत्र जबाबदार असल्याची चर्चा



मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना १३ जुलै २०२६ रोजी लिहिलेले एक पत्र समोर आले असून, या पत्रामुळे पक्षांतर्गत नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. या पत्रात राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रप्रपंचामुळे आणि त्यातील टीकेमुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कमालीचे संतप्त झाले असून, याच नाराजीतून त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.



उदय आहेर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस करताना आठ प्रमुख कारणांचा दाखला दिला आहे. पार्थ पवार हे २१ व्या शतकातील उमद्या तरुणांचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून लंडन येथे उच्च शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरील आर्थिक व राजकीय घडामोडींचे उत्तम आकलन आहे, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच त्यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असल्याने त्याचा उपयोग देशपातळीवर पक्षवाढीसाठी होऊ शकतो, असा दावाही आहेर यांनी केला आहे.



या पत्रातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पक्षातील काही नेत्यांचा 'अनाजीपंत' असा उल्लेख करत टीका करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असा खोटा प्रचार पक्षातीलच काही घटकांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. ज्याप्रमाणे इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे कारस्थान तत्कालीन अनाजीपंतांनी केले होते, तसेच कृत्य आज पक्षातीलच काही लोक करत असून अजितदादांच्या निधनानंतर एका ३८ वर्षांच्या तरुण नेत्याची कारकीर्द संपवण्याचा हा कट असल्याचा गंभीर आरोप आहेर यांनी केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार यांचे खच्चीकरण करण्याचे जे प्रयत्न झाले, त्यावर मात करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देऊन विरोधकांना सडेतोड उत्तर द्यावे, हीच अजितदादांचीही इच्छा होती आणि त्यांचे हे अपूर्ण स्वप्न आता सुनेत्रा पवार यांनी पूर्ण करावे, असे या पत्रात म्हटले आहे.



नेमके काय घडले?


दरम्यान, पक्षातील एका प्रदेश उपाध्यक्षाने अशा भाषेत पत्र लिहून ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य केल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अत्यंत संतप्त झाले आहेत. पार्थ पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून ज्येष्ठ नेत्यांना कशा प्रकारे बाजूला सारले जात आहे, याबद्दल या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडल्याचे समजते. दुसरीकडे, या पत्रानंतरच पटेल व तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली तक्रार केल्याचा दावा खुद्द उदयकुमार आहेर यांनी केला असून, या संपूर्ण वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे