Wednesday, July 15, 2026

Jayant Patil : माझा आणि प्रफुल पटेल, तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीचा संबंध नाही - जयंत पाटील

Jayant Patil : माझा आणि प्रफुल पटेल, तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीचा संबंध नाही - जयंत पाटील

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री घडलेल्या नाट्यमय भेटीगाठींवर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच, शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (jayant Patil) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. "माझा आणि प्रफुल पटेल (Praful Patel) किंवा सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या मुख्यमंत्री भेटीशी काडीचाही संबंध नाही. मी माझ्या मतदारसंघातील एका स्थानिक नागरी प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो," असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

रात्री उशिरा झालेल्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जयंत पाटील (jayant Patil) यांनी संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट केला. ते म्हणाले, माझ्या इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आले आहे. याच कायदेशीर व प्रशासकीय प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली होती. मी रात्री साडेदहा वाजता 'वर्षा' निवासस्थानी पोहोचलो आणि पावणेअकरा वाजता तिथून बाहेर पडलो. मुख्यमंत्र्यांशी माझी केवळ ५ मिनिटे चर्चा झाली. मी तिथे गेलो तेव्हा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तिथे उपस्थित आहेत, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तटकरे-पटेल यांच्यासोबत आपली कोणतीही ठरवून किंवा संयुक्त बैठक झाली नसल्याचे सांगत त्यांनी 'एनडीए' प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

हा योगायोग असूच शकत नाही - अमोल मिटकरी

जयंत पाटील (jayant Patil) यांनी ही भेट निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले असले, तरी अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार अमोल मिटकरी यांनी यावर अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. "राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूंचे तीन बडे नेते रात्रीच्या वेळी एकत्र येऊन जर मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटत असतील, तर तो निव्वळ योगायोग असूच शकत नाही. ही महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात होणाऱ्या मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे," असा दावा मिटकरी यांनी केला. इतकेच नव्हे तर, जयंत पाटील यांनी कालच आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत एक बैठक घेतल्याची माहिती समोर येत असून, शरद पवार गटातील काही प्रमुख आमदार आणि खासदार 'एनडीए'मध्ये सामील होण्यास पूर्णपणे तयार असल्याचा दावाही मिटकरी यांनी या वेळी केला.

जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटल्यास वावगे काय? - अंकुश काकडे

दुसरीकडे, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी जयंत पाटील यांची बाजू घेत या भेटीतील राजकीय हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. "जयंत पाटील हे राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी किंवा अन्य शासकीय कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असतील, तर त्यात विशेष किंवा वावगे काहीच नाही. लोकशाहीत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी कोणताही लोकप्रतिनिधी जाऊ शकतो, त्यामुळे यात राजकीय अर्थ शोधणे चुकीचे आहे. सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे दोघे ठरवून एकत्र गेले असतील असे मला अजिबात वाटत नाही," असे मत काकडे यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >