मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. विशेष म्हणजे, अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आधीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तिथे उपस्थित होते. एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे प्रमुख शिलेदार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’सोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे कोअर कार्यकारिणीमधून वगळण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) अंतर्गत मतभेदांचे नाट्य रंगले होते. हा वाद शमतो न शमतो, तोच मंगळवारी रात्री अचानक तटकरे आणि पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले. या दोन्ही नेत्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू असतानाच, अचानक तिथे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ‘एन्ट्री’ झाली. दोन्ही गटांचे नेते एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे अर्धा तास या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीचा अधिकृत तपशील अद्याप गुलदस्त्यात असला, तरी यामागे मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत.
या भेटीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबईत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत जयंत पाटील यांनी पक्षाच्या १० पैकी ९ आमदारांची मते जाणून घेतली. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आणि पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आतापासूनच भाजप आणि ‘एनडीए’सोबत जाणे आवश्यक आहे, असे मत यातील बहुतांश आमदारांनी जयंत पाटील यांच्याकडे मांडले. आमदारांपाठोपाठ पक्षाच्या खासदारांनीही या पर्यायाला अनुकूलता दर्शवली असल्याचे समजते.
पक्षाच्या या भूमिकेनंतर जयंत पाटील यांनी, "मी आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईन," असे आमदारांना सांगितले होते. त्यामुळे जयंत पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतची बैठक ही शरद पवारांच्या संमतीनेच सुरू असलेल्या वाटाघाटींचा एक भाग असल्याचे बोलले जात असून, आता अंतिम चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे.
रोहित पवारांचा निर्णय काय?
शरद पवार गटातील सर्व प्रमुख आमदार आणि खासदार 'एनडीए'सोबत जाण्याच्या तयारीत असताना, पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी मात्र या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला आहे. जयंत पाटील यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीपासून रोहित पवार जाणीवपूर्वक दूर राहिले होते. भाजप किंवा एनडीएसोबत जाण्यास त्यांचा विरोध असून, बैठकीनंतर त्यांनी स्वतः सर्व आमदारांशी वैयक्तिक फोनवर संपर्क साधून त्यांचे मत बदलण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार हे पक्षाच्या व्यापक हितासाठी आमदारांच्या दबावापुढे झुकून ‘एनडीए’चा रस्ता धरतात की रोहित पवारांच्या भूमिकेला प्राधान्य देतात, यावर राष्ट्रवादीच्या या गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.






