Tuesday, July 14, 2026

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा

मुंबई : उबाठा गटाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) व त्यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्या विरोधात त्यांची सून गिरिजा राऊत यांनी दाखल केलेल्या छळ आणि अघोरी कृत्य प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी ठाणे न्यायालयात धक्कादायक खुलासे समोर आले. संशयित आरोपी फिरोज शेख नावाच्या बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, काळा धागा आणि सुगंधी द्रव्ये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी संशयित आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास यंत्रणेने केली. (Firoz Sheikh)

२०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी फसवणूक केली, मानसिक व भावनिक छळ केला, तसेच वेगवेगळ्या बाबा-बुवांकडे नेऊन अघोरी उतारे टाकल्याचा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची मंगळवारी ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे तपास अधिकारी संदीप धांडे यांनी न्यायालयात तपासाची प्रगती सादर केली. "या प्रकरणातील संशयित आरोपी राम यलप्पा वडार याला सिंधुदुर्गमधून अटक करण्यात आली आहे. तर संशयित फिरोज शेख बाबा याची दोन दिवस पुरेशी चौकशी करता आलेली नाही. या बाबाच्या दर्ग्याची झडती घेतली असता तिथे लिंबू, टाचण्या, काळा धागा आणि सुगंधी द्रव्ये आढळून आली आहेत. हे साहित्य आणि सुगंधी द्रव्ये नेमकी कोणाकडून आणली गेली, याचा तपास करायचा आहे," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच, फिरोज शेख हा बाबा विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गमधील गावातल्या मूळ घरी अघोरी कृत्य करण्यासाठी गेला होता, असा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर सलग पाच गुरुवार गिरिजा राऊत यांना दर्ग्यात बोलावण्यात आले होते. या दर्ग्यामध्ये लिंबू, झाडाची पाने, पाणी आणि सुगंधी द्रव्ये अंगावरून उतरवण्यात आली. त्यामुळे गिरिजा राऊत यांना मोठा शारीरिक व मानसिक त्रास जाणवत होता, असेही पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.

सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

 

- तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात काही आर्थिक व्यवहारांचे कोन देखील समोर आले असून, त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. या बाबाकडे गुरुवार आणि शनिवारी येणाऱ्या इतर काही भक्तांवरही अशी अघोरी कृत्य झाली असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. - गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्गात जाऊन तपास करण्यासाठी प्रवासाचा वेळ लक्षात घेता आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती पोलिसांनी केली. - गिरिजा राऊत यांचे वकील अक्षय माने यांनीही पोलिसांच्या भूमिकेचे समर्थन करत, दर्ग्यातून जप्त झालेले साहित्य हे स्पष्टपणे जादूटोणा आणि अघोरी विद्या केली गेल्याचे दर्शवते. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले.

दर्ग्यावर पाणी देणे हा गुन्हा आहे का?

दुसरीकडे, संशयित आरोपी फिरोज शेख याच्या वकिलांनी पोलिसांचे सर्व आरोप फेटाळून लावले. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी हा गुन्हा का दाखल केला जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "दर्ग्यामध्ये जाऊन पूजा-पाठ करणे, तिथे लिंबू किंवा पाणी आढळणे यात संशयास्पद काय आहे? दर्ग्यावर पाणी देणे हा गुन्हा ठरतो का? दापोलीमध्येही असाच एक ऐतिहासिक दर्गा आहे, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी निधी दिला होता," असा युक्तिवाद करत वकिलांनी फिरोज शेख याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा