Monday, July 13, 2026

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. (Sunetra Pawar)

अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्य, उपचार आणि मदतकार्याबाबत तातडीच्या सूचना दिल्या. त्यांनी पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमी वारकऱ्यांना तात्काळ आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत तसेच आवश्यक ती सर्व मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. (Sunetra Pawar)

राज्य सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे - सुनेत्रा पवार

यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबीयांना धीर दिला. राज्य सरकार मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांसह आणि जखमींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Sunetra Pawar)

जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी :

या दुर्घटनेबाबत सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हटले की, "आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे." अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. (Sunetra Pawar)

वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी :

"पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वाहनचालकांनी पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी," असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. दरम्यान, प्रशासनाकडून अपघाताची चौकशी सुरू असून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Sunetra Pawar)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >