Thursday, July 9, 2026

"घरात बसणारे अन् . . . "; मुंबई भाजपचा राज ठाकरेंच्या ‘टीकेवर’ पलटवार

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुंबई भाजपने अत्यंत आक्रमक व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "मुंबई संकटात असताना स्वतः गायब राहणारे आणि अमीर खानच्या लग्नात नाचणारे कोण, अन् रस्त्यावर उतरून सेवा करणारे कोण?" असा थेट सवाल उपस्थित करत भाजपने राज ठाकरेंसह(Raj Thackarey) उद्धव ठाकरे (Uddhav thackarey) गटावरही निशाणा साधला आहे. मनसे कामगार सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी 'विकासाच्या नावाखाली सगळ्या शहरांचा विचक झालाय' आणि 'भावनाशून्य, दुर्घटनेवर आमदार हसतात' अशी टीका केली होती, त्याला मुंबई भाजपने डिजिटल माध्यमाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.

'स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग' बंद झाल्यामुळे गँग बिथरली: मुंबई भाजपचा घणाघात

मुंबई भाजपने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. "मुंबईत नेहमीप्रमाणे मुसळधार पाऊस आलाय... पण लक्षात ठेवा, यावेळी मुंबईत मुंबईकरांना वाऱ्यावर सोडणारं 'उबाठा'चं घरबसं सरकार नाही, तर जनतेची काळजी घेणारं भाजपचं खंबीर सरकार आहे," असा टोला भाजपने उद्धव ठाकरेंना लगावला. महापालिकेतील 'स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग' बंद झाल्यामुळेच सध्या ठाकरेंची गँग बिथरल्याचा घणाघातही या निवेदनात करण्यात आला आहे.

राज ठाकरेंवर राजकीय हल्लाबोल

मुंबई भाजपने आपल्या प्रत्युत्तरात राज ठाकरे यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. "जेव्हा जेव्हा मुंबई संकटात असते, तेव्हा भाजपचे नेते स्वतः गुडघाभर पाण्यात उतरून मुंबईकरांच्या मदतीला धावतात. पण दुसरीकडे, स्वतःला मुंबईचे तारणहार म्हणवणारे राज ठाकरे मात्र संकटकाळात थेट अमीर खानच्या लग्नात हजेरी लावतात, तिथे नाचतात आणि एन्जॉय करतात!" अशी टीका केली. स्वतः ऐन संकटसमयी गायब राहायचे आणि रात्रंदिवस काम करणाऱ्या भाजप नेत्यांवर टीका करायची, हा कुठला न्याय? असा सवालही उपस्थित केला आहे.

 उद्धव ठाकरेंवर 'स्टंटबाजी'चा आरोप

याच व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई भाजपने सध्या सुरू असलेल्या 'राम रक्षा' आंदोलनावरही अत्यंत गंभीर आणि तीव्र आक्षेप घेतला आहे. 'राम रक्षा'च्या नावाने आंदोलन करणारे एका वेगळ्याच पातळीचे ढोंगी आणि मूर्ख आहेत, अशी बोचरी टीका केली आहे. "जनतेच्या प्रश्नांशी या आंदोलकांना काहीही देणंघेणं नाही, फक्त प्रसिद्धीसाठी चाललेली ही केवळ स्टंटबाजी आहे. मुंबईकर अशा संधीसाधू, ढोंगी आणि स्वतःला स्वयंभू समजणाऱ्या नेत्यांना आता चांगलंच ओळखून आहेत," असे म्हणत भाजपने विरोधकांचे मनसुबे उधळून लावले आहेत.

'राजकीय नौटंकी आता तरी थांबवा!'

व्हिडिओच्या शेवटी मुंबई भाजपने ठाकरे बंधूंना थेट इशारा देत म्हटले आहे की, "तुमची ही राजकीय नौटंकी आता तरी थांबवा! कारण संकटकाळात घरात बसणारे आणि लग्नात नाचणारे कोण, अन् रस्त्यावर उतरून सेवा करणारे कोण... हा फरक आता मुंबईकरांसमोर स्पष्ट झाला आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >