Wednesday, July 8, 2026

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व येथील नागरदास रोड परिसरात रस्त्यावरून चालत असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीवर झाडाची फांदी कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री सुमारे १०.१२ वाजता अंधेरी सबवे जवळील डीजे हाऊस परिसरात घडली.

जखमी व्यक्तीची ओळख आदेश गायकवाड अशी झाली असून त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेली झाडाची फांदी हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत शेकडो झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे झाडांची देखभाल, मुळांभोवतीचे काँक्रीटीकरण आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून नागरिकांकडून अधिक प्रभावी उपाययोजनांची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >