Saturday, July 4, 2026

दाट धुक्यामुळे काही दिसेनासे झाले तेव्हा...

दाट धुक्यामुळे काही दिसेनासे झाले तेव्हा...

- अनिल तोरणे, स्मृतीपटल

आपल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी देव आनंद निघाले पण दाट धुक्यामुळे त्यांना पुढचा रस्ताच दिसेना! त्यात चष्मा हॉटेलवरच विसरुन आलेले... मग वहिदा रहमान यांना त्यांचे गाइड व्हावे लागले.

गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेते-निर्माते देव आनंद यांचे चाहते त्यांच्यासाठी जीव टाकत असत. त्यांनी अंगावर काळा सूट चढवला की काहीतरी वेगळेच वाटत असे. त्यांच्या केशसंभाराबद्दल काय बोलावे? लहान मुले असोत, तरुण असोत की वृद्ध असोत ते देव आनंद यांच्याप्रमाणेच आपली केशरचना ठेवण्यासाठी धडपडत असत. त्यांची जी एक विशिष्ट ढब होती तिची जनसामान्यांना मोहिनी पडली होती. देव आनंद फार बोलत नसत; शांत राहणारे होते. आपल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी देव आनंद निघाले पण दाट धुक्यामुळे त्यांना पुढचे काही दिसेनासे झाले आणि...

देव आनंद यांच्या ‘नवकेतन फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘काला बाजार’ हा चित्रपट निर्माण करण्यात येत होता. त्याचे बाह्यचित्रीकरण उटी या शहराबाहेर केले जात होते. उटीमधील ज्या हॉटेलमध्ये निर्मिती संच (युनिट) उतरला होता त्या हॉटेलपासून किमान दीड तासांच्या अंतरावर बाह्यचित्रीकरण सुरू होते. म्हणून सकाळीच संचातील सगळे लोक चित्रीकरणस्थळी रवाना झाले होते. हॉटेलमध्ये देव आनंद, वहिदा रहमान, वहिदा यांची भगिनी आणि वहिदा यांची केशभूषाकार असे चौघेच होते. चित्रीकरणाला जाण्यासाठी देव आनंद यांच्या गाडीत त्या तिघी बसल्या. गाडीत बसताना वहिदा रहमान यांना देव आनंद म्हणाले, मी स्वत:च गाडी चालवितो. ते ऐकून वहिदा त्यांना म्हणाल्या, ठीक आहे गाडी तुम्ही चालवा.

ते सगळे गाडीतून निघाले आणि जेमतेम अर्धा तास झाला असेल इतक्यात त्या पहाडी भागात धुके पडण्यास सुरुवात झाली. बघता बघता धुके इतके वाढले की देव आनंद यांना रस्ताच दिसेना! गाडीत मागच्या आसनावर बसलेल्या वहिदा रहमान यांना ते म्हणाले, वहिदा मला पुढचे काहीच दिसत नाहीये. ते ऐकताच वहिदा रहमान आश्चर्याने त्यांना म्हणाल्या, म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे आहे? काहीच दिसत नाही? देव आनंद म्हणाले, दाट धुके आहे ना! त्यावर वहिदा त्यांना म्हणाल्या, हो धुके तर आहेच; पण तुम्ही म्हणताय की मला काहीच दिसत नाहीये याचा अर्थ काय? त्यावर देव आनंद मोठा गौप्यस्फोट करीत असल्याच्या अाविर्भावात त्यांना म्हणाले, मी चष्मा लावतो ना! मग चष्मा का नाही लावलात, असे वहिदा यांनी त्यांना विचारले. देव आनंद म्हणाले, चष्मा मी हॉटेलवरच विसरून आलो आहे. वहिदा म्हणाल्या, आता काय करायचे? देव आनंद म्हणाले, आता असे करू की तुम्ही पुढच्या आसनावर येऊन बसा आणि तुमच्या दीदी व केशभूषाकार मागेच बसतील. तुम्ही मला रस्ता सांगत राहा. डावीकडे वळायचे की उजवीकडे वळायचे हे सांगा. ते ऐकून वहिदा रहमान विचारात पडल्या की ही तर मनावर दडपण आणणारी बाब आहे. पण हे करण्याशिवाय आता काहीच गत्यंतर नाही, असे मनातल्या मनात म्हणून वहिदा रहमान पुढच्या आसनावर विराजमान झाल्या.

गाडी पुढे निघाली खरी पण वहिदा रहमान यांच्या मनावरील दडपण कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. एक तर दाट धुके, डोंगराळ भागातील रस्ता आणि तिसरी बाब म्हणजे समोरून एक लष्करी वाहन जवानांना घेऊन येत होते. ते पाहून देव आनंद यांना वहिदा रहमान म्हणाल्या, देव, समोरून जवानांना घेऊन लष्करी वाहन येत आहे. त्या डोंगरांमधील रस्ता इतका अरुंद होता की दोन वाहने एकमेकां शेजारून जाणे केवळ अशक्य होते आणि गाडी मागेही घेता येत नव्हती. अशी परिस्थिती पाहून देव आनंद यांना वहिदा म्हणाल्या, देव तुम्ही आम्हाला खड्ड्यात घालणार आहात की काय! आपण मागेही जाऊ शकत नाही आणि आपल्याला पुढे तर जायचे आहे आणि ही मोठमोठी लष्करी वाहने येत आहेत. ते ऐकून देव आनंद म्हणाले, मी अत्यंत कमी वेगाने गाडी चालवेन. तुम्ही मला रस्ता व्यवस्थितपणे सांगत राहा.

अखेर तो डोंगराळ रस्ता कसाबसा पार करून देव आनंद चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचले. लागणाऱ्या वेळापेक्षा ते तब्बल एक तास विलंबाने पोहोचल्याने चित्रीकरणाच्या ठिकाणी आधी येऊन पोहोचलेले देव आनंद यांचे धाकटे बंधू दिग्दर्शक विजय आनंद आणि संचातील इतर सगळे सदस्य चिंताक्रांत बनले होते; कारण रस्ता डोंगराळ होता. देव आनंद यांची गाडी इच्छित ठिकाणी पोहोचताच विजय आनंद यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांनी विचारले, तुम्हाला इतका उशीर का झाला? त्यावर वहिदा रहमान त्यांना म्हणाल्या, गोल्डी, आपले बंधुराज त्यांचा चष्मा हॉटेलवर विसरून आले आहेत. धुके आणि लष्करी वाहनांमुळे आमच्यावर प्रचंड दडपण आले होते; पण सुदैवाने आम्ही इथवर सुखरूपपणे पोहोचलो. वहिदा रहमान यांनी येतानाचा हा अनुभव कथन करताच सगळ्या उपस्थितांचा जीव भांड्यात पडला आणि नंतर संपूर्ण संच चित्रीकरणाच्या कामात मग्न झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा