हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट १९७६ साली म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी आला होता! दिग्दर्शक होते वसंतराव तथा अप्पासाहेब जोगळेकर. प्रमुख कलाकार होते डॉ. काशिनाथ घाणेकर, आशा काळे, लालन सारंग आणि राजा गोसावी. सोबत दिग्गज अशोककुमारही होते. त्याशिवाय देवेन वर्मा, धुमाळ, मधु आपटे, संजीवनी बीडकर, सुमती गुप्ते, जयराम कुलकर्णी आणि श्रीकांत मोघे यांच्याही भूमिका होत्या. त्यावेळी चित्रपटातील गाणी खूप गाजली. ‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा’ आणि ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ ही गाणी तर आकाशवाणीवर नियमित ऐकू येतात. आजही ती अनेकांच्या ओठावर आहेत. त्यात एक फार सुंदर संकल्पना असलेले गाणे लिहिले होते सुधीर मोघे यांनी! लग्न झाल्यावर आपल्या मुलीला सासरी पाठवणाऱ्या आईच्या मन:स्थितीची आठवण करून देणारे हे गाणे महिलांना खूप भावुक करणारे होते. कारण जवळजवळ प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या घरातून लग्नानंतर सासरी आलेली असते. तशीच तिची अवस्था तिच्या पोटच्या लेकराची सासरी पाठवणी करताना होत असे. प्रत्येक आईचे, माहेरच्या लोकांचे मन त्या क्षणी कसे सैरभैर होते याचे वर्णन या गाण्यात आले आहे.
दिग्दर्शकांनी गाण्यासाठी सिनेमातला प्रसंग मात्र नायिका आणि तिच्या मैत्रिणी शेतात भाताची रोपे लावत आहेत असा निवडला होता. त्याच प्रसंगाला गृहीत धरून गाणे रचले गेले. भात या एकाच पिकाचे वैशिष्ट्य असे असते की त्याची रोपे एका ठिकाणी लावून, थोडी वाढवून, उपटून, दुसरीकडे लावली जातात. लहानपणी ‘जपानी भातशेती’वरच्या धड्यात हे वाचल्याचे अनेकांना आठवेल! मुलींचेही तसेच असते. त्या आई-वडिलांच्या कुटुंबात लहानाच्या मोठ्या होतात आणि उपवर झाल्या की लग्न होऊन दुसऱ्या घरात, अनेकदा दुसऱ्या गावात आणि अलीकडे तर दुसऱ्या देशातही रवाना होतात! असे हे सगळी नातीगोती तोडून, भावबंध सोडवून घेऊन, दुसऱ्या अनोळखी जगात जाणे किती गोंधळात टाकणारे, प्रसंगी अस्वस्थ करणारे, अनेकदा तर रडवणारे असते हे फक्त मुलींनाच कळू शकते. नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत असली तरी जाताना त्यांना आणि आई-वडिलांनाही रडू कोसळतेच. सुधीर मोघेंच्या या गाण्यात त्यांनी भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या नवविवाहित मुलींची उपमा दिली आहे. हे खुद्द कविवर्य सुधीर मोघ्यांनीच लिहून ठेवले आहे. या सिद्धहस्त कवीने प्रांजळपणे हेही नमूद केले आहे की, ही कल्पना त्यांना दिग्दर्शक जोगळेकरांनी सुचवली होती.
गाण्याची पहिलीच ओळ आपल्याला पावसाळ्यातल्या गावाकडच्या डोंगरावरून झपझप येणाऱ्या पहिल्या सरीची आठवण देते. क्षणार्धात पावसाळी वातावरणात घेऊन जाते. खांदेशातल्या लोकांना तर बैलगाडीत बसून सासरी निघालेली करकरीत कोऱ्या साडीतली वधूसुद्धा डोळ्यांसमोर येईल, डोक्याला मुंडावळ्या तशाच ठेवून गाडीत बसलेले नवरा-नवरीसुद्धा दिसतील कारण या गाण्यात काहीशी खांदेशी वाटणारी मराठी वापरली आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी पावसाचा हुबेहूब फील देणारी सुंदर चाल आणि कर्णमधुर संगीत देताना मध्येच एखाद्या तमाशातील नृत्याला द्यावे तसे संगीताचे तुकडे का टाकलेत ते मात्र कळत नाही. कदाचित नाचताना अभिनेत्रींना ठेका मिळावा म्हणून अशी विजोड तडजोड केली गेली असावी! आशाताई आणि अनुराधा पौडवालांनी गाण्याचे सोनेच केले आहे. कथानक असे होते - वारंवार कानावर पडलेल्या एका झाडावरील भुताच्या कहाणीने नायिकेच्या मनावर परिणाम होऊन ती भीतीने वेडी होते. तिचा भावी पती डॉक्टर असल्याने तिच्यावर उपचार सुरू करतो. तात्पुरती बरी झाल्यावर पुन्हा तिचे वेडेपण परत येते. बिचारा डॉक्टर ते आपले अपयश समजून परत जायची तयारी करतो. त्याच रात्री भूत त्या वेडीला गळफास घ्यायचा इशारा करते. नेमक्या त्या क्षणी तिथे येऊन पती तिचा जीव वाचवतो आणि पाठोपाठ त्या भुताचा पर्दाफाश होतो अशी ही सुखांत कथा. गाण्याचे चित्रीकरण भाताच्या शेतातच असल्याने कोकणातील पार्श्वभूमीवर असली तरी त्यातील डोळ्यांसमोर तरळत जाणाऱ्या प्रतिमा या सर्व जुने रीतीरिवाज पाळणाऱ्या भाबड्या, खान्देशी कुटुंबातील वाटतात. ते कदाचित भाषेमुळेही असेल.
पंडित मंगेशकरांनी सजवलेल्या सुधीरजींच्या त्या सुंदर गाण्याचे शब्द होते -
आला आला वारा, संगे पावसाच्या धारा... पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा, सया निघाल्या सासुरा...”
सिनेगीतात निसर्गाचे सुंदर वर्णन करणे हे तर या गीतकाराचे वैशिष्ट्यच होते. नवविवाहितेच्या अंगावर नुकत्याच लागलेल्या हळदीचे तेज असते. म्हणून कवी म्हणतो, ‘बघा तिचे रूप कसे चमकते आहे. शेतात पडलेले कोवळे ऊन म्हणजे तिच्या अंगावर जणू हळदीचा लेप लावला आहे. नव्या जीवनाच्या स्वप्नांचे स्मित ओठावर असले तरी आई-वडिलांचा कायमचा निरोप घ्यावा लागण्याच्या दु:खामुळे डोळ्यांत अश्रूंची गर्दी आहे - ‘नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप, माखलं गं ऊन जणू हळदीचा लेप, ओठी हासू पापणीत आसवांचा झरा’
ग्रामीण भागातली आई मुलीना कशी प्रेमाने, आहे त्या परिस्थितीतही, लाडाकोडाने वाढवते, मुलीला निरोप देताना तिच्या काळजाचे कसे पाणी पाणी होते ते सांगताना कविवर्य आईची मन:स्थिती ३ ओळीत मांडतात.- “आजवरी यांना किती जपलं जपलं, काळजाचं पाणी किती शिपलं शिपलं, चेतवून प्राण यांना दिला गं उबारा.”
आता मुलीचे लग्न झाल्यावर, ती सासरी गेल्यावर, तिचे कसे होईल? ही काळजी जुन्या आयांना, विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना खूप सतावत असे. हे गाणे अर्ध्या शतकापूर्वीच्या महाराष्ट्रातले आहे. त्यामुळे आई बिचारी मनातल्या मनात काळजी करते. सासरी तिला कसे वागवतील, नव्या जबाबदाऱ्या संभाळणे जमेल की नाही? असे आईला वाटत राहते. शेवटी काळजी असह्य झाल्यावर ती सगळे देवावर सोडताना म्हणते, ‘तो आभाळात बसलेला सगळ्यांचा बापच माझ्या मुलीचाही सांभाळ करील. तिचा संसार फुलू देईल. तिची वंशवेल बहरेल, फुलेल, फळेल असे म्हणून आई स्वत:ला आश्वस्त करून घेते - ‘येगळी माती आता गं येगळी दुनिया, आभाळाची माया बाई करील किमया, फुललं बाई पावसानं मुलुख गं सारा...’ जुन्या गाण्यातून जुने समाजजीवन, भावविश्व अनुभवताना रसिक श्रोत्यालाही त्या काळात एक सफर करून आल्याचा आनंद मिळतो. काळ जरी आमूलाग्र बदलला असला तरी कुठे कुठे अजून काही चांगले, सात्त्विक शिल्लक असेल ही आशा तेवत राहते.






