Saturday, July 4, 2026

नर्मदावतरण

नर्मदावतरण
भालचंद्र ठोंबरे, महाभारतातील मोतीकण 

भारतात गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी या नद्यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व नर्मदेलाही आहे. भारतात पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमध्ये नर्मदा ही सर्वात मोठी नदी आहे. नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावून तिथून मध्य प्रदेशात १०७८ किमी, महाराष्ट्रात ५४ किमी, गुजरातमध्ये १६० किमी, असे एकूण अंदाजे १३०० किमी. एवढे अंतर पार करून खंबाताच्या आखातामधून अरबी समुद्राला मिळते. नर्मदेची उत्पत्ती भगवान शंकराने अमरकंटक येथे केलेल्या तपश्चर्ये दरम्यान आलेल्या घामातून झाली म्हणून तिला शिवपुत्री मानले जाते. तिला रेवा, अमरजा, रुद्रकन्या, मेकलकन्या आदी नावानेही ओळखतात. तिच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे असल्याने नर्मदा परिक्रमेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नर्मदेच्या काठावर केलेल्या शुभकार्याचे पुण्य अनेक पटीने वाढते असे भक्तगण मानतात. नर्मदेच्या स्नानाने गंगा स्नानाचे पुण्य लाभते. नर्मदेच्या जलाचे आचमन केल्याने किंवा नदीच्या फक्त नामस्मरणाने देखील अनेक जन्मांची सर्व महापापे नष्ट होतात. प्रातःकाली नर्मदेच्या स्मरणाने सात जन्माच्या पापातून मुक्ती मिळते असे स्कंद पुराणात सांगितले आहे.

सरस्वतीचे पाणी तीन दिवस, यमुनेचे एक आठवडा प्राशन केल्याने व गंगेचे पाण्याला स्पर्श करताच पापे नाहीशी होतात, मात्र नर्मदेचे केवळ दर्शन केल्यानेही पापक्षालन होते असेही मानले जाते. पद्म पुरणानुसार गंगेला हरिद्वारमध्ये, सरस्वतीला कुरुक्षेत्रमध्ये विशेष पवित्र मानतात. मात्र नर्मदा ही सर्वच ठिकाणी पवित्र आहे. भिन्न भिन्न युगात नर्मदेच्या पृथ्वीवर अवतरणाच्या भिन्नभिन्न कथा किंवा आख्यायिका सांगितल्या जातात. स्कंदपुराणानुसार सत्ययुगातील चंद्रवंशात हिरण्यतेजा नावाचा ऋषितुल्य राजा होता. एकदा अमावस्येला सूर्यग्रहण असताना राजाने आपल्या पितरांना तृप्त केले; परंतु त्यांना पाणी पिण्यासाठी जम्बुद्विपात एकही नदी नव्हती. तेव्हा पितरांनी हिरण्यतेजाला जलप्राशनासाठी नर्मदेला पृथ्वीवर आणण्यास सांगितले. हे ऐकून हिरण्यतेजाने उदयाचल पर्वतावर भगवान शिवाची घनघोर तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर त्याने नर्मदेला पृथ्वीवर आणण्याचा वर मागितला. त्याच्या आग्रहाने शिवाने नर्मदेला आवाहन केले व तिला हिरण्यतेजाची विनंती सांगितली. नर्मदेने ती मान्य केली; परंतु नर्मदेला पृथ्वीवर येण्यासाठी आधाराची गरज होती ती जबाबदारी उदयांचल पर्वताने स्वीकारली व नर्मदा पृथ्वीवर अवतरली. अशाप्रकारे राजाने आपल्या पितरांना मुक्ती दिली.

दुसऱ्या आख्ययिकेनुसार वैष्णव मन्वंतरात चंद्रवंशात पुरुरवा नावाचा राजा होऊन गेला. ब्राह्मणांनी त्याला पितरांच्या पापमुक्तीसाठी नर्मदेला पृथ्वीवर आणण्याची विनंती केली. पुरुरवाने भगवान शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न होताच त्याने आपला मनोदय व्यक्त केला. पुरुरव्याची आग्रही मागणी पाहून त्यांनी पुरुरवाला नर्मदेला पृथ्वीवर नेण्याचे वरदान दिले. मात्र तिला आधारासाठी गरज असल्याने विंध्य पर्वताचा पुत्र पर्यक पर्वताने ती जबाबदारी स्वीकारली व अखेर नर्मदा पृथ्वीवर अवतरली. अन्य एका आख्यायिकेनुसार दक्ष सावर्णी मन्वंतरात पुरुकुत्सु नावाचा राजा होऊन गेला. त्याने कठोर तपश्चर्येद्वारे शंकराला प्रसन्न करून घेऊन वरदानाद्वारे नर्मदेला भुतलावर आणले. पूर्वी पृथू राजाने ज्या ठिकाणी यज्ञ केला होता, त्या भूमीवर नर्मदा उतरली. सर्व देव, गंधर्व, ऋषीमुनींनी तिचे स्वागत करून, त्यांनी स्पर्श करून आपणास पवित्र करण्याची विनंती केली. मात्र आपण कुमारिका असल्याने तसे मला करता येणार नाही असे नर्मदेने सांगितले. तेव्हा ऋषीमुनींनी तिला पृथ्वीवर आणणाऱ्या पुरूकृत्सुशी विवाह करण्याची विनंती केली. नर्मदेने ती मान्य केली व अशा प्रकारे पुरूकृत्सुने आपल्या पितरांना मुक्ती दिली.

नर्मदा नदी पश्चिम वाहिनी का आहे, या संदर्भात एक आख्यायिका आहे. नर्मदा व सोनभद्र यांचा विवाह ठरला होता. नर्मदेने आपली एक दासी जुहीला हिला सोनभद्रकडील वर्तमान जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे पाठविले; परंतु तिच्याजवळ उंची वस्त्रे नसल्याने नर्मदेने स्वतः जवळील वस्त्रे व साज शृंगार देऊन तिला रवाना केले. सोनभद्र जुहीलाच नर्मदा समजून तिच्या प्रेमात पडला व त्यांनी विवाह केला. बराच वेळ होऊनही जुहीला न आल्याने नर्मदा तिला पाहण्यासाठी गेली. तेव्हा तिला वास्तविकता कळली. जुहीने केलेल्या विश्वासघाताचा तिला अतिशय राग आला व आजन्म कुमारिका राहण्याचा निश्चय करून ती उलट पावली पश्चिमेकडे निघाली. म्हणून नर्मदा पश्चिम वाहिनी झाली. नर्मदा नदीच्या अति तीव्र प्रवाहाने त्यातील दगडांची आपसात टक्कर होऊन त्यांचा आकार अंडाकार व चोपडा होतो. तो शिवलिंगा सारखा बनतो. यांना स्वयंभू शिवलिंग म्हणतात. त्यांना नर्मदेश्वर बाणलिंग असेही म्हणतात. अनेक जण यांची घरात पूजा करतात. विशेष म्हणजे यांना प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते अशी मान्यता आहे.  शिवलिंगाला तुळशीपत्र वाहत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा