Saturday, July 4, 2026

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा

मुंबई : ३० जून २०२६ रोजी चेंबूर येथील रोड नं. ११ येथे शालेय बसवर ६०-७० वर्षे जुने पिंपळाचे झाड कोसळून त्यात ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दाखवलेल्या निष्काळजीपणावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी (Shaina NC) यांनी आज (४ जुलै) बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली सविस्तर भूमिका मांडली.

चेंबूर येथे झालेल्या या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने या घटनेबाबत केलेला खुलासा म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याचे मत शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांनी व्यक्त केले आहे. पडलेले झाड हे १२ मे २०२६ रोजी संपूर्णपणे 'निरोगी' असल्याचा अहवाल पालिकेने दिलेला होता तर २९ मे रोजी झाडाची छाटणी करण्यात आली असल्याचे पालिकेने आपल्या अहवालात म्हंटले आहे.

मात्र, रोड नं. ११ वरील झाडांच्या मुळांना एप्रिल २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे पालिकेच्याच चौकशी अहवालातून समोर आले आहे. यामुळे या प्रकरणी जबाबदार धरून मुंबई महानगरपालिकेने ३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

खरे तर "झाड पडणे ही नैसर्गिक क्रिया आहे." पण त्यासाठी शहरात पडलेला मुसळधार पाऊस हे फक्त निमित्त आहे. खरे कारण हे वृद्ध झालेली झाडे आणि त्यांच्या मुळाची व्यवस्थित निगा राखली न जाणे हेच आहे.

त्यामुळे पुन्हा अशी दुर्घटना घडून कुणा विहानचा जीव त्यात जाऊ नये यासाठी मुंबईतील सर्व धोकादायक झाडांची त्रयस्थ संस्थेच्या तज्ञांमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासोबतच केवळ 'बाह्य तपासणी' नको, तर मुळांची सोनोग्राफी करून तपासणी बंधनकारक करावी अशीही मागणी शायना एनसी यांनी केली आहे.

तसेच मुंबई महानगरपालिकेचा रस्ते विभाग आणि बाग विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव ही दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी संबंधितावर कठोर कारवाई करावी अशीही मागणी शायना यांनी केली आहे.

त्यासोबतच धोकादायक झाडांच्या छाटणीबाबत नागरिकांच्या तक्रारींकडे 'दुर्लक्ष'न होता, ७२ तासांच्या आत त्यावर कार्यवाही व्हावी अशी यंत्रणा उभारण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच मृत विहान श्रीवास्तव कुटुंबाला अडीच लाखांची केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी मदत असून पालिकेने या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन किमान १० लाखांची मदत या कुटुंबाला द्यावी अशीही आग्रही मागणी शायना यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >