Thursday, July 2, 2026

Yogesh Kadam : भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, जनतेत उतरावे लागते; मंत्री योगेश कदमांचा राज ठाकरेंना थेट टोला!

Yogesh Kadam : भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, जनतेत उतरावे लागते; मंत्री योगेश कदमांचा राज ठाकरेंना थेट टोला!

- सोशल मीडियावरील विकृत प्रवृत्तींना चाप बसणार, महायुती सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या तयारीत

मुंबई : केवळ व्यासपीठावरून मोठी भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष जनतेमध्ये उतरून काम करावे लागते. महायुती सरकार म्हणून आम्ही सातत्याने जनतेच्या हिताचे काम करत आहोत आणि म्हणूनच लोकसभा, विधानसभाच नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे," असा थेट आणि अत्यंत मोजका टोला मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. राजकारणात कोणाचा फायदा करायचा आणि कोणाचा तोटा, हे ठरवण्याचा अधिकार फक्त जनतेलाच असतो, असे सांगत त्यांनी महायुती सरकारच्या कामाची पावती जनतेच्या दरबारात मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला. (Yogesh Kadam)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची तुलना 'देहविक्री' करणाऱ्यांशी केल्याबद्दल मंत्री योगेश कदम यांनी अत्यंत तीव्र आक्षेप घेतला. लोकशाहीत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल अशा हीन शब्दांत तुलना करणे अत्यंत अयोग्य आणि निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना भूतकाळाची आठवण करून देत कदम (Yogesh Kadam) यांनी एक खोचक सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, "जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मनसेचे ६ नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले होते, तेव्हा राज ठाकरे यांचे या 'देहविक्री'च्या व्याख्येवर काय मत होते? हे त्यांनी एकदा जनतेसमोर स्पष्ट करावे." या विधानातून त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेतील दुटप्पीपणावर थेट निशाणा साधला. (Yogesh Kadam)

दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आत्मचिंतनाच्या सल्ल्याला उत्तर देताना मंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील त्रुटींवर बोट ठेवले. शिवसेनेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून जेव्हा उद्धव ठाकरे यांची नेते म्हणून निवड करण्यात आली, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचार आणि आत्मचिंतन व्हायला हवे होते, असा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे नेते झाल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच नारायण राणे, राज ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला आणि शेवटी पक्ष वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐतिहासिक उठाव करावा लागला. त्यामुळे संजय राऊत यांनी महायुती किंवा इतर पक्षांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या शिल्लक राहिलेल्या पक्षाचे आत्मचिंतन करावे, असा सणसणीत सल्लाही त्यांनी दिला. (Yogesh Kadam)

माध्यमांशी बोलताना मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि वैयक्तिक टार्गेट करण्याच्या विकृत प्रवृत्तीवर राज्य सरकार गंभीर असल्याचे सांगितले. सध्या सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना शिवीगाळ केली जाते, ठराविक अजेंडा राबवून लोकांना टार्गेट केले जाते. या प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांमध्ये सुसंस्कृतपणा राखण्यासाठी महायुती सरकार लवकरच एक अत्यंत कडक कायदा आणण्याच्या विचारात असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे अशा विकृत प्रवृत्तींना चाप बसेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. (Yogesh Kadam)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >