पर्यायी प्रश्नपत्रिका का नसावी?
२८ जून रोजी जी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार होती, तिची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या चोवीस तास आधी फुटल्याने ती परीक्षा थेट रद्द करण्यात आली. त्यामुळे सुमारे सहा लाख परीक्षार्थ्यांना आर्थिक नुकसान, मनस्ताप व इतर त्रास सहन करावे लागले. त्यांचे भवितव्य टांगणीला लागले गेले, त्यांचे एकूण नियोजन कोलमडले. त्याबाबतीत आम्हा सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडतो की, प्रश्नपत्रिका जर तब्बल चोवीस तास आधी फुटली होती; तर नवीन, पर्यायी प्रश्नपत्रिका लगेचच तयार का करण्यात आली नाही? त्यासाठी दोन-तीन तासदेखील पुरले असते. आपल्या देशाने तंत्रज्ञानात इतकी लक्षणीय प्रगती केलेली आहे, की नवीन प्रश्नपत्रिका तयार ठेवून, ती परीक्षा सुरू होण्याच्या दोन-तीन तास आधी परीक्षा केंद्रांकडे परस्पर ईमेलद्वारे अथवा अन्य अत्याधुनिक व गोपनीयता राखण्याची सुविधा असलेल्या माध्यमाद्वारे पाठवून, तिथेच प्रश्नपत्रिका छापण्याची व्यवस्था करणे ही अगदी किरकोळ बाब आहे. त्यामुळे काही केंद्रांवर कदाचित तांत्रिक अडचणी येऊन परीक्षा सुरू होण्यास अर्धा-पाऊण तास विलंब झाला तर तेथील परीक्षार्थ्यांना पेपर सोडविण्यास तेवढा जास्तीचा वेळ देता येईल. भविष्यात मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या बाबतीत अशी व्यवस्था निष्णात व अनुभवी तंत्रज्ञांच्या सल्ल्याने राबविणे आवश्यक वाटते. त्याचप्रमाणे, अशा पेपरफुटींच्या मागे कुणी वैफल्यग्रस्त अराजकवादी राजकीय नेते आहेत किंवा काय याबाबत सर्व यंत्रणांनी जागरूक राहणे आवश्यक वाटते.- अविनाश वाघ, पुणे
न्यायालयासह पोिलसांची प्रशंसनीय भूमिका
नसरापूर बलात्कार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा जाहीर, हे वाचून, पीडितेच्या आई-वडिलांना तसेच समस्त जनतेला हायसे वाटले असेल. बलात्काराच्या या प्रकरणाचा अवघ्या दोन महिन्यांत न्यायालयाने जलदगतीने लावलेला निकाल पाहून न्यायालयाचे आभारच मानायला हवेत; परंतु त्याचबरोबर पोलिसांनाही धन्यवाद द्यायला हवेत. याचे कारण बलात्कारासारख्या प्रकरणात, प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे परिस्थितीनुसार पुरावे गोळा करणे फार जिकिरीचे काम असते; परंतु पोलिसांनी पुराव्याच्या बाबतीत कोणतीही कसर न ठेवल्यामुळे व आपली कामगिरी चोखपणे बजावल्यामुळे, आरोपीला फाशीसारख्या क्रूर तख्तापर्यंत पोहोचवता आले. संताप एकाच गोष्टीचा येतो की, या नराधमाने चिमुरड्या मुलीवर, अत्याचार केला; परंतु आपण त्या गावचेच नाहीत हे दाखवण्यासाठी, त्याने खोटा बनाव रचला. व असे सांगितले की, मी तिला घेऊन जाताना, ती रस्त्यात पडली. व तिच्या डोक्याला लागल्यामुळे, ती सारखी रडत होती. व मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात हा गुन्हेगार किती बेरकी व नाटकी आहे, हे सिद्ध होते. या आरोपीबाबत न्यायाधीशांनी नोंदवलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे. आता या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी द्यावी. सांगायचे तात्पर्य हेच की, यापुढे बलात्कारांच्या प्रकरणात प्रत्येक गुन्हेगाराला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यास, गुन्हेगार या प्रकाराचे गुन्हे करताना, दहादा विचार करतील.- गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पूर्व)
नराधमास फाशीचीच शिक्षा योग्य
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावल्याने ‘त्या’ चिमुरडीला न्याय मिळाल्याची भावना जनमानसात आहे. वासनांध, लिंगपिसाट अशा या दूर्वर्तनी नराधमास फाशीचीच शिक्षा योग्य आहे. कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही! ही म्हण यथार्थच आहे! यापूर्वीचा या नराधमाचा इतिहास पाहता अत्याचाराच्या अनेक घटना या नराधमाच्या हातून घडल्या आहेत. खरे तर समाजाने अशा लिंगपिसाट, वासनांध गिधाडाचा वेळीच बंदोबस्त करायला हवा होता. समुपदेशन अथवा त्याच्या अशा विकृत लैंगिक वृत्तीवर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे होते; परंतु समाजाकडून आणि त्याच्या कुटुंबीयांकडूनही हे घडले नाही. हे न झाल्यामुळेच हा आरोपी चांगलाच सोकावला गेला. याचेच पर्यवसान निरापराध चिमुरडीचा बळी जाण्यात झाले! खरे तर अशा विकृत लिंगपिसाट, वासनांध गिधाडांना आवरण्याचे काम समाजाचेही आहे! याचेही समाजाला भान असावे!- श्रीकांत मा. जाधव, सातारा
परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा किती सडल्या आहेत
राज्यातील लाखो उमेदवारांच्या व शिक्षकांच्या भवितव्याशी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. शिक्षक होणाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षण कायदा अस्तित्वात आल्यानंतर नोकरीत असलेल्या व शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी टीईटी परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वांच्या परीक्षांचे पेपर फुटणे हे देशात आता नित्याचे झाले आहे. मग ती परीक्षा एमपीएससी, नीट आता टीईटी परीक्षा असो किंवा अगदी दहावी किंवा बारावीची परीक्षा असो सर्वच परीक्षांचे पेपर फुटत आहेत. परीक्षेचा पेपर फुटतो आणि त्याचबरोबर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खचून जातो. कारण शिक्षक पात्रता परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्याची परीक्षा नाही, ती भविष्यातील पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता ठरवण्यातही प्रक्रिया आहे. टीईटीच्या परीक्षेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाले असतील. नीट पेपरफुटीचे सावट देशभर असताना महाराष्ट्रात हा प्रकार घडावा, हे भयंकर दुर्दैवी आहे. पोलिसांनी भिवंडीतून अटक केलेल्या तिघांचे धागेदोरे बिहार, ओडिशा आदी राज्यापर्यंत पोहोचले आहेत.- सुनील कुवरे, मुंबई






