Wednesday, July 1, 2026

Jalgaon Murder Case : भुसावळमधील कालिका माता मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा उलगडा, 'तो' एक पुरावा अन आरोपी ताब्यात

Jalgaon Murder Case : भुसावळमधील कालिका माता मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा उलगडा, 'तो' एक पुरावा अन आरोपी ताब्यात

Jalgaon Murder Case : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कालिका माता मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, भ्रमणध्वनी लोकेशनचा माग, घटनास्थळी भौतिक किंवा तांत्रिक पुरावे आणि हत्येसाठी वापरलेले कोणतेही हत्यारही सापडले नसताना अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत पोलिसांनी या घटनेचा उलगडा करत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भुसावळ शहराजवळील रेल्वे मार्गालगतच्या दुर्गम परिसरात कालिका मंदिरानजीक २८ जून रोजी रात्री संतोष रघुवीर मंचाल (५५) यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते आणि घटनास्थळावरून कोणताही महत्त्वाचा भौतिक पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.

अखेर 'तो' धागा सापडला अन कारवाईला दिशा मिळाली

मृताच्या जबड्यावर आणि बरगड्यांवर झालेल्या जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे कोणत्याही हत्याराचा वापर झालेला नसल्याने पोलिसांनी अंदाज व्यक्त केला की, हल्लेखोर शारीरिकदृष्ट्या सक्षम, बॉक्सर किंवा खेळाडू असू शकतो. दरम्यान, गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की, २८ जूनच्या रात्री एका हळदी समारंभात वाद झाला होता. त्या वादात एका व्यक्तीला मारहाण करतानाची चित्रफीतही समोर आली. ज्यामध्ये हर्षल राजू वर्मा हा मारहाण करताना दिसत होता. परिसरात तो बॉक्सर म्हणून ओळखला जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

‘ह्युमन इंटेलिजन्स’ निर्णायक ठरली

हर्षल वर्माची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्या रात्रीच्या त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. गुप्त माहितीच्या आधारे हर्षल आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसून चौकशी आणि कौशल्यपूर्ण उलटतपासणीनंतर त्यांच्या कथांतील विसंगती समोर आली. अखेर त्यांनी संतोष मंचाल यांच्या हत्येची कबुली दिली. तपासात हर्षल राजू वर्मा (१९), क्षितिज संजय भालेराव (१९) , प्रफुल्ल उत्तम जाधव (२१) या तिघांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

रेल्वेचे भंगार चोरीच्या वादातून हत्या

तिन्ही संशयितांच्या कबुली जबाबानुसार, ते रेल्वेचे लोखंडी भंगार चोरी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी संतोष मंचाल तेथे आले आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद पुढे थेट हाणामारीत बदलला. रागाच्या भरात संशयितांनी संतोष मंचाल यांना जबर मारहाण केली आणि याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे कारण या प्रकरणात कोणतेही प्रत्यक्ष किंवा तांत्रिक पुरावे नसतानाही शवविच्छेदन अहवाल, गुप्त माहिती आणि हळदी समारंभातील चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >