Monday, June 29, 2026

Nitesh Rane : जे स्वतः मुल्लांची पार्टी चालवतात त्यांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये!

Nitesh Rane : जे स्वतः मुल्लांची पार्टी चालवतात त्यांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये!

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : "जे स्वतः मुल्लांची पार्टी चालवत आहेत, त्यांनी आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये आणि आम्हाला हिंदुत्व शिकवू नये," अशा शब्दांत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackary) यांच्यावर हल्लाबोल केला. विधानभवनाच्या प्रांगणात माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. तसेच, राज्यातील पारंपारिक मच्छिमारांच्या डिझेलचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

मासेमारी बंदी कालावधीत वाढ करण्याच्या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदन केल्यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख ‘बाबरी जनता पार्टी(Babji Janta Party)’ केल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. "स्वतः मुल्लांची पार्टी चालवणाऱ्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर बोलण्याची गरज नाही," असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांबाबत बोलताना, "मच्छिमारांसाठी आमच्या सरकारने एवढा ऐतिहासिक निर्णय घेतला तरी तुम्हाला त्यांचीच पडली आहे, तो तर फुकट मच्छी खाणारा माणूस आहे," अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

समुद्रात होणाऱ्या एलईडी फिशिंग आणि कर्नाटकच्या बोटींकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले, "आमचे सरकार आल्यापासून आम्ही एलईडी फिशिंगवर मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. समुद्रात ड्रोनद्वारे सुरक्षा वाढवण्यात आली असून आधुनिक गस्ती नौका तैनात करण्यात आल्या आहेत. एलईडी फिशिंग हा ड्रग्ज आणि तस्करीसारखाच एक मोठा आणि गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या विरोधात राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर असून कोणतीही गय केली जाणार नाही", असा इशाराही त्यांनी दिला.

मच्छिमारांचा डिझेल प्रश्न लवकरच सुटणार

मच्छिमारांना डिझेल कोटा वाढवून मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री राणे यांनी सांगितले की, "आम्ही सत्तेत आल्यापासून मासेमारीला कृषीचा दर्जा दिला असून 'मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना' सुरू केली आहे. आता मासेमारी बंदीचा कालावधीही वाढवला आहे. पारंपारिक मच्छिमार टिकला आणि वाढला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. डिझेलच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार अतिशय सकारात्मक आहे. मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच मच्छिमारांना यातून मोठा दिलासा मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भायखळ्यातील घटनेवर प्रतिक्रिया

शुक्रवारी भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना उंदीर मारण्याच्या विषाच्या (झिंक फॉस्फेट) गोळ्या वाटण्यात आल्या होत्या. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यावर पेनकिलरच्या नावाखाली विषाच्या गोळ्या वाटणाऱ्या फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले, "या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. तो व्यक्ती नक्की काय करत होता आणि त्याचा हेतू काय होता, हे येत्या काही दिवसांत तपासाअंती स्पष्ट होईल. तो व्यक्तीही मुस्लिम समाजाचाच होता. या लोकांमध्ये आपापसात तरी भाईचारा आणि 'गंगा-जमुना तहजीब' असायला हवी, पण तीही दिसत नाही. पोलीस तपासानंतर यातील कट समोर येईल".

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा