Monday, June 29, 2026

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक १ जुलैला

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक १ जुलैला

- सभापती राम शिंदे यांची घोषणा; नीलम गोऱ्हे यांचा प्रबळ दावा, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

Maharashtra Vidhan Parishad : मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Legislative Council) रिक्त असलेल्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवार, दि. १ जुलै रोजी पार पडणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे  (Ram Shinde) यांनी सोमवारी सभागृहात या निवडणुकीच्या अधिकृत तारखेची घोषणा केली. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची सदस्यत्वाची मुदत संपल्यापासून हे पद रिक्त होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये विशेषतः शिवसेनेच्या गोटात या प्रतिष्ठेच्या पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सभापती राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम ७ मधील तरतुदींचा वापर करून त्यांनी १ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांना आपले प्रस्ताव आणि लेखी सूचना मंगळवार, दि. ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्याकडे विधानभवनातील कक्ष क्रमांक ९०३ येथे सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता प्राप्त प्रस्तावांची आणि नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल. सध्या राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती पद आणि विधानसभेचे अध्यक्ष पद ही दोन्ही पदे भाजपकडे आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) आहे. महायुतीमधील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार विधान परिषदेच्या उपसभापती पदावर शिवसेनेचा दावा असून हे पद त्यांच्याकडेच जाणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी पक्षांतर्गत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

नीलम गोऱ्हे यांचा दावा प्रबळ

माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत १३ मे २०२६ रोजी संपली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी दिल्याने या शर्यतीत त्यांचे नाव सर्वात आघाडीवर मानले जात आहे. त्यांना पुन्हा संधी मिळते की ऐनवेळी नवे नाव समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेत पक्ष विलीन केलेल्या बच्चू कडू यांचा यथोचित मानसन्मान राखण्यासाठी त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिकमधील दराडे बंधूंची नाराजी दूर करण्यासाठी आमदार किशोर दराडे यांच्या गळ्यातही उपसभापती पदाची माळ पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

संख्याबळाचा विचार करता विधान परिषदेत सध्या सत्ताधारी महायुतीकडे स्वतःचे ५६ आमदारांचे भक्कम बळ आहे. याशिवाय काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचे पारडे जड असल्याने विरोधी पक्षांकडून या निवडणुकीत उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, १ जुलै रोजी होणारी ही निवडणूक बिनविरोध पार पडेल, असे संकेत मिळत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >