- कृषीमंत्री दत्ता भरणे; ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) वितरणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, आगामी ५ जुलैपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
यापूर्वी ३० जून रोजी कर्जमाफीची रक्कम दिली जाईल असे संकेत होते, मात्र तांत्रिक प्रक्रिया आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आता ५ जुलैनंतर प्रत्यक्ष निधी वाटप केले जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे.
मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील १ लाख ११ हजार शेतकऱ्यांना नव्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ॲपचा वापर करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्या तातडीने सोडवल्या जातील. तसेच, केंद्र सरकार आणि अन्य महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी 'फार्मर आयडी' अत्यंत गरजेचा आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार केले जाणार असून, यासाठी गावोगावी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर नगरी आज अक्षरशः विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेली. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… निवृत्तीनाथ महाराज की जय…” ...
१ हजार ११९ खतविक्री परवाने रद्द
राज्यात खते आणि बियाणांची कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही देताना मंत्र्यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील १ हजार ११९ खतविक्री दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच, कापूस उत्पादकांकडून मागणी होत असलेल्या 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांबाबत बोलताना, या बियाण्यांना केंद्राकडून अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, लोकप्रतिनिधींनी तालुका स्तरावर 'कृषीभवन' उभारण्याची मागणी केली असून, यावर सरकारकडून तातडीने सकारात्मक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
१७ जिल्ह्यांतील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार
काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या आपत्तीवर मोठी घोषणा करताना कृषीमंत्र्यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, पंचनाम्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या अवकाळी पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.






