Monday, June 29, 2026

HSRP Registration : ३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई

HSRP Registration : ३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई
मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे. या मुदतीनंतर म्हणजेच १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे कारवाई करतील. याशिवाय अशा वाहनधारकांना आरटीओमधील अनेक महत्त्वाच्या सेवा मिळणार नाहीत. वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जाची नोंद किंवा वजावट, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवान्याचे नूतनीकरण यांसारखी कामे HSRP नंबर प्लेटशिवाय होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. (Maharashtra Transport Department) परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, ३० जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा दिला जाईल. राज्यात HSRP बसविण्यासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले आहेत. झोननुसार नियुक्त कंपन्यांमार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या दरामध्ये फिटमेंट शुल्काचा समावेश असून जीएसटी स्वतंत्रपणे लागू होईल.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >