टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल
डॉ.गणेश चंदनशिवे यांनी कबाड कष्ट करून, खडतर परिस्थितीवर मात करून आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. देश-विदेशात लोककला पोहोचविण्याचे काम ते अविरतपणे करीत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.त्यांचे मूळ गाव टेंभुर्णी, तालुका - जाफराबाद, जिल्हा जालना. तसे त्यांचे वडिलोपार्जित गाव बीड, केज तालुक्यात राधेगाव हे त्यांचे गाव. तिथे त्यांचा वडिलोपार्जीत तमाशा होता. त्यांचे सात चुलते तमाशामध्ये होते. त्यांचे वडील तमाशात नाच्याचे काम करीत असत. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची चळवळ सुरू झाली होती. त्यांचे दोन नंबरचे चुलते तोताराम यांनी त्यांच्या वडिलांना मारले आणि सांगितले की शिका, डोळ्यांत काजळ लावून नाच्याचे काम करणे बंद करा. त्यानंतर वडिलांनी शिक्षण घेतले. केवळ शालेय शिक्षण नाही तर भोपाळला त्यांनी स्काऊट टीचरचे प्रशिक्षण घेतले. औरंगाबाद येथील पिंपळगावमध्ये त्यांना शाळेत नोकरी लागली. त्यांनी गणेश यांच्या चुलत भावांना शिकविले, परंतु जेव्हा त्यांची शिकायची पाळी आली तेव्हा त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली.
गणेशजींना शिक्षणाची खूप ओढ होती. अनेक हालअपेष्टा सहन करत त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्याच वेळी युथ फेस्टिव्हलमध्ये त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली. तमाशातील गायकीचा तेथे त्यांना फायदा झाला. नंतर औरंगाबादला जाऊन त्यांनी फेस्टिव्हलमध्ये चॅम्पियनशिप जिंकली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात त्यांनी पुढील पाच वर्षांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. प्रा. सुधीर गव्हाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चंदिगढ, अमृतसर, हिस्सार, नागपूर, ग्वालियर, जबलपूर येथे जाऊन गोल्ड मेडल मिळविले. तिथले शिक्षण संपले, परंतु जीवनाचा उदरनिर्वाहाचा संघर्ष सुरूच होता. १ जानेवारी २००६ ला मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागात सहा. प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला.गायिका सुलोचना चव्हाण यांचे चिरंजीव विजय चव्हाण यांना तबला वादक झाकीर हुसेनचे भाऊ तौफिक भाई यांनी ' फॉरेस्ट 'अल्बमसाठी मराठी फोक गाणारा व्यक्ती पाहण्यात आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी डॉ. गणेश यांचे नाव सुचविले. तो अल्बम खूप गाजला. त्यानंतर रणजीत बरोट यांच्या 'शैतान' चित्रपटामध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची दारे खुली केली. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासोबत त्यांची घट्ट मैत्री जुळली. ‘माय कंट्री माय म्युझिक’ हा कॉन्सर्ट त्यांच्यासोबत केला जातो. 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाचा अनुभव कसा होता असे विचारल्यावर ते म्हणाले की बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या गाण्यासाठी मला बोलावणे आले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना संगीताचा चांगला कान आहे. या चित्रपटासाठी त्यांनी ९९ लोकांकडून गाणे गाऊन घेतले होते, तरी त्यांचे समाधान होत नव्हते. माझा १०० वा नंबर आला. माझे गाणे त्यांना पसंद पडले आणि त्या चित्रपटातील गाण्यासाठी माझी निवड झाली. एकदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या जुहूच्या बंगल्यात आम्ही बसलो होतो, त्यावेळी दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा सारे जण उपस्थित होते, संजयजी मला म्हणाले, ' दीपिका आपको कैसी दिखती है?' मी म्हणालो, 'अच्छी दिखती है .' संजयजी मला म्हणाले आताच्या आता मला यावर काही तरी लिहून द्या. तिथेच 'नवतुनी आली अप्सरा... अशी सुंदरा...' हे बोल लिहिले आणि गायिलेही. हे गाणे खूपच हिट झाले. या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना प्रतिष्ठित प्लॅटिनम अॅवॉर्ड देखील मिळाला आहे. नंतर त्यांची अनेक गाणी आली. साधारणपणे वर्षभरात एक ते दोन गाणे ते करतात; परंतु ते गाणे हिट होते.
१२ ऑगस्ट २००४ साली कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी लोककला विभागाची स्थापना केली आणि त्याचा आता वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थीं बाहेर पडलेले आहेत आणि आता पाच विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. करीत आहेत.भारतीय संस्कृती टिकली पाहिजे, त्यासाठी अस्तंगत होत चाललेल्या लोककला टिकल्या पाहिजेत आणि ह्या लोककला टिकविण्यासाठी चंदनासारखे झिजले पाहिजे. चंदनासारखे झिजून, लोककलेचा आवाज बनून परदेशात लोककला पोहोचविण्याचे कार्य डॉ. गणेश चंदनशिवे अगदी मनापासून करीत आहेत.