राजरंग-राज चिंचणकर
पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या पंढरीच्या रायाची मोहिनी केवळ वारकऱ्यांनाच नव्हे; तर विविध क्षेत्रातल्या मंडळींना आहे. नाट्यक्षेत्रही याला अपवाद नाही. रंगमंचीय अवकाशात रंगणारे काही रंगकर्मी सुद्धा या वारीत मिसळून जातात. मराठी नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले रंगकर्मी, निर्माते संदीप विचारे यांनी अलीकडेच 'विठू माऊली' या नाटकाची निर्मिती केली आहे. नाट्यक्षेत्रातल्या भ्रमंतीसह अनेक गडकिल्ल्यांचीही भटकंती करणाऱ्या संदीप विचारे यांना, पंढरीच्या वारीचा योग मात्र आला नव्हता. पण एकदा अचानक हे सर्व जुळून आले आणि समस्त जनांच्या प्रवाहात तेही सामील झाले. या रंगकर्मीने अनुभवलेली अशीच एक 'विठ्ठल वारी' त्यांच्याच शब्दांत...
एकदा पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या वर असलेल्या कलादालनात भरलेल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन पाहात असताना, एका प्रकाशचित्रावर माझी नजर खिळली. कुठल्यातरी घाटातून भगवे झेंडे, पताका मिरवत वारकऱ्यांची दिंडी चालली आहे; असे ते चित्र होते. तो काळ मोबाईल, इंटरनेटचा नव्हता, की सर्च केले आणि माहिती मिळाली. कॅमेऱ्यात रोल टाकून तेव्हा फोटो काढले जायचे. प्रदर्शन पाहून मी खाली आलो. बुकिंग ऑफिसवरच्या आमच्या मित्रांकडे चौकशी केली, तेव्हा कळले की पुण्यातून दिवे घाट ओलांडून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीचा तो फोटो आहे. 'आम्हां न कळे ज्ञान, न पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हां' या संत वचनाप्रमाणे आम्हाला पुराण, वेद, पालखी सोहळा कसा माहीत असणार? आम्ही मुंबईत राहणारे. कुठली दिंडी, कुठली वारी, कुठला पालखी सोहळा...! नाही म्हणायला आषाढी एकादशीला शाळेत दिंडी, मिरवणूक काढली जात असे आणि आम्ही विठोबाच्या दर्शनाला वडाळ्याला जात असू, इतकेच...!
पुण्याहून मुंबईला येताना ते दिंडीचे प्रकाशचित्र डोक्यातून काही केल्या जात नव्हते. मुंबईत आलो आणि नाटकाच्या व्यवस्थापनाची कामे सुरू झाली. अशातच एक योगायोग घडला. नाटकाची जाहिरात देण्यासाठी दादरस्थित बी. वाय. पाध्ये जाहिरात एजन्सीमध्ये मी गेलो. तिथे काम करणारे धामणस्कर काका मला म्हणाले, "यंदा वारीला येणार का? मी चाललोय. चला माझ्याबरोबर". पडत्या फळाची आज्ञा... मी लगेच "हो" म्हणालो. त्या वारीत जितकी शक्य होईल तितकी वारीची माहिती मिळवायची, खास करून दिवे घाटाची, असे ठरवले. धामणस्कर काकांसोबत पुण्यात आलो आणि तिथून वारीत. लोणंद, फलटण, पुढील सदाशिवनगर येथे तेव्हा माऊलींचे गोल रिंगण पार पडत असे. दिंड्या, पताकांचे भार, जयजयकार, नामघोष, रिंगणात भान हरपून धावणारे विणेकरी, तुळस घेतलेल्या आया-बाया आणि माऊलींचे अश्व पाहिले. अंगावर रोमांच उभे राहिले. त्या वर्षीच्या वारीत रिंगण सोहळा अनुभवला. दिवे घाटाची माहिती मिळवली आणि सिद्ध झालो मी व माझा भाऊ अजय, पुढच्या वर्षीचा दिवे घाटाचा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी...!
यासाठी माझा मित्र दीपक शिंदे याने दिवे घाटाखाली आमची राहण्याची सोय केली. आम्ही पहाटेच तयार झालो; हा अनुपम सोहळा अनुभवायला आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करायला. पुण्यातून निघालेली माऊलींची पालखी हडपसर ओलांडून दिवे घाटाकडे निघाली; सासवड मुक्कामासाठी...! देवाची उरळी येथे विसावा घेऊन पालखीच्या रथाला जास्तीचे बैल जोडण्यात आले; दिवे घाटाची चढण सोपी जावी म्हणून...! वारकऱ्यांनी दिवे घाट फुलून गेला होता. 'टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची...!' वारीत 'माऊली माऊली', असा गजर टिपेला पोहोचला होता. वारकऱ्यांचा पांढरा शुभ्र वासुकी, दिवे घाट घुसळून जणू माऊलीच्या पालखीचे अमृतदर्शन जनांना घडवत होता. आम्ही तृप्त मनाने आणि साश्रुनयनाने महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती कॅमेऱ्यात बंदिस्त करत होतो. या धावपळीचे सार्थक विठ्ठल प्रसादाने झाले. दिवे घाटातल्या मधल्या मार्गाने उतरून मस्तानी तलावावर आम्ही आलो. मोकळ्या शिवारात विसावलो. सूर्य मावळतीकडे निघाला होता आणि वारकरी सासवडकडे...! पश्चिम क्षितिजावर मावळतीच्या सूर्यकिरणांची सप्तरंगी उधळण सुरू झाली. रंगपंचमीच जणू...! आम्ही ही निसर्गाची रंगपंचमी कॅमेऱ्यात कैद केली. पुढे ठाण्यात भरणाऱ्या फोटोग्राफीच्या स्पर्धेत वारीच्या प्रकाशचित्रांना पारितोषिके मिळाली. हा तो 'विठ्ठल प्रसाद'. या सोहळ्यात आम्ही सहभागी व्हावे म्हणून झटणारे धामणस्कर काका आणि दीपक आता वैकुंठवासी झाले आहेत. जेव्हा पालखीचे हे फोटो वर्तमानपत्रात येतात, तेव्हा त्यांची आणि वरील प्रसंगाची आठवण येते.
यंदा अलीकडेच पालखीने दिवे घाट ओलांडला आणि ही आठवण ताजी झाली. आता पुढे सोन्याची जेजुरी, सोपानाचे सासवड, निरा स्नान, निंबाळकरांचे फलटण, उभे रिंगण, चांदोबाचा लिंब, गोल रिंगण, सदाशिव नगर, वाखरी आणि सरतेशेवटी 'पंढरी'...! आम्ही सध्या पंढरीच्या रायाच्या या वारीचे गुणगान करणारे 'विठू माऊली' हे नाटक आमच्या कुवतीप्रमाणे सादर करतो. आम्हां लेकरांच्या या भक्तिमय सादरीकरणाला शक्तीचे बळ मिळू दे, अशी विठुरायाच्या चरणी आमची प्रार्थना आहे.