शेंगा, रानभाजी आणि बरंच काही...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद 



काही वर्षांपूर्वी गजेंद्र अहिरेंचं शेवग्याच्या शेंगा नावाचं, संजय मोने आणि स्वाती चिटणीस अभिनित नाटक येऊन गेलं होतं. नंतर तेच नाटक पुण्याच्या प्रणव जोशी या तरुण निर्मात्यानं पुनरुज्जीवित केलं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या वेळेसही आज लिहू, उद्या लिहू म्हणेपर्यंत नाटक बंद झालं; परंतु तेच नाटक आता हिंदीत धुमाकूळ घालतंय म्हटल्यावर त्यावर लिहिणं, ते देखील तौलनिक पद्धतीनं लिहिणं भाग आहे म्हणूनच हा अट्टहास.



‘शेवग्याच्या शेंगा’ची पहिली आवृत्ती पाहिल्यानंतर गजेंद्र अहिरेंचे ड्रीम प्रोजेक्ट वगैरे असेल असे मला काही वाटले नव्हते. साधी सोप्पी गोष्ट, साध्या सोप्प्या सादरीकरणात लता नार्वेकरांच्या बजेटात त्याने सादर केली होती. संजय मोनेने तर स्क्रिप्ट हातात घेऊन, डोळे बंद करुन, उजव्या हाताने वजन केल्याच्या अाविर्भावात, "हे तासाभराचं लिखाण आहे" असा शेराही मारला होता. पण दिग्दर्शक स्वतः गजेंद्रच असल्याने बघता बघता नाटक अडीज तासावर येऊन कसं स्थिर झालं याची कल्पना कुठल्याच कलाकाराला येऊ शकली नव्हती. नाटक चांगलं चालंत होतं पण कुठे माशी शिंकली समजलं नाही पण लताबाईनी नाटक आवरलं. गजेंद्र पुन्हा त्याच्या चित्रपट दिग्दर्शनात रमून गेला. बाय द वे कुणाही वाचकाला १००% माहीत नाहिये म्हणून सांगतो, आजवर त्याने ७२ चित्रपट दिग्दर्शित केल्याचा रेकाॅर्ड बरंच काही सांगून जातो. या वर्षाअखेर त्याचे ७५ सिनेमे तयार असतील. दिग्दर्शकिय कामाचा एवढा सपाटा (उरक) आजवर मी पाहिलेला नाही आणि याची दखल हिंदीवाले तर घेणारच ना ? अनुपम खेर हा सिनेमासाठी गजेंद्रशी जोडला गेला, आणि दोघेही पूर्ववत नाटकवाले झाले. हल्लीच 'जाने पहचाने अंजाने' या नावाने 'शेवग्याच्या शेंगा' पुन्हा पहायला मिळाले. गेले काही महिने मी, अभिजित पानसेची आणि अभिजित माझी घाशीराम कोतवाल सारखी कालातीत कलाकृती भव्यदिव्य स्वरुपात हिंदी रंगभूमीवर आणल्याबद्दल एकमेकांची पाठ थोपटत असू. परंतु गजेंद्रने अजून एक मराठी नाटक भव्य स्वरूपात सादर करून इतिहास रचला आहे. मराठी नाटकाची उंची मराठी माणसाला अद्याप कळलेली नाही. ती मराठी सोडून जगाला कळून चुकलिय. पाचशे रुपयांचे रडत खुरडंत तिकिट काढणारे मराठी प्रेक्षक हिंदी नाटकाचे दहा हजार तिकिट बघून हबकूनच जातील. परंतू नाटकाचा ग्रॅंज्यर (Grandeure) पाहून पैसा वसूल नाटक कसे द्यायचे याचे धडे मराठी निर्मात्यांनी आणि सूत्रधार तथा मॅनेजर म्हणवणाऱ्यांनी तसंच नाटक देवावर सोपवून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी हे नाटक पहावेच पहावे.



नाटकाची कथा दोन ज्येष्ठ नागरिकांभोवती फिरते—सुधीर आणि विमल बर्वे. सुधीर ससाणे हे बँकेतून निवृत्त झालेले गृहस्थ; पत्नीचे अचानक निधन झाल्याने आणि मुलीचे लग्न झाल्याने ते घरात एकाकी आहेत. दुसरीकडे, विमल बर्वे यांच्या पतीचेही निधन झाले आहे, मात्र त्यांनी कमावून ठेवलेली संपत्ती भरपूर आहे. या दोघांची ‘शेवग्याच्या शेंगा’ घेण्यातून भेट होते आणि नाटक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत रंगत जाते. “शेवग्याच्या शेंगा” या मराठी नाटकाची गोष्ट तीन पिढ्यांतील माणसांच्या नात्याभोवती फिरते; त्यात एकटेपणा, अपेक्षा, संवादहीनता आणि आधुनिक जीवनशैलीत हरवलेले मानवी मूल्य यांचे चित्रण आहे. हे नाटक प्रामुख्याने ओळख–अनोळखीपणा, नातेसंबंधांतील गैरसमज आणि माणसांच्या भूमिकांमधील फरक यावर भाष्य करते. आणि 'जाने पहचाने अंजाने' या नावातूनच सूचित होतं की काही पात्रे एकमेकांना “ओळखत” असतात, पण प्रत्यक्षात ती “अनोळखी” राहतात; किंवा उलट, “अनोळखी” वाटणारी माणसं अचानक जवळची वाटू लागतात अशा नाट्यातून पात्र-संवाद, चुकीच्या गृहितकांमुळे निर्माण होणारे संघर्ष आणि शेवटी होणारे आकलन यांवर भर देणारे ठरणार आणि घडतेही तसेच. हे नाटक संवादातून पात्रांच्या मानसिक अवस्था उभी करणारे आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष पात्रांच्या भावना आणि संभाषणांवर केंद्रित राहते. काही प्रसंग हलकेफुल्के विनोदी असले, तरी नाटकाचा गाभा गंभीर आणि सामाजिक तथा कौटुंबिक प्रश्नांकडे नेतो. नाटक विनोदी संवादांतून मांडले असले तरी त्याच्या गाभ्यात गंभीर सामाजिक-भावनात्मक प्रश्न आहेत. उदा. ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा आणि मुला-मुलींच्या अपेक्षांमधील दरी तसेच पिढ्यांमधील संवादहीनता.आधुनिक करिअर-आकांक्षा आणि पारंपरिक नात्यांमधील ताण आणि महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन जीवनातून माणसाच्या भावविश्वाचा शोध.बऱ्याच दिवसांनी कानेटकरी, दळवी, शन्नांच्या नाटकांची आठवण करुन देणारी लेखनशैली अनुभवल्यानंतर कौतुकानुरूप कृतज्ञता व्यक्त करणे हे सुद्धा नाट्यनिरीक्षकाचे कर्तव्य असते. ते पुढील लेखातही वाचकांना वाचायला मिळेल.
(छाया : संजय पेठे)

Comments
Add Comment

संवेदनशील आठवणींची 'पंढरीची वारी'

राजरंग-राज चिंचणकर पंढरीच्या रायाशी संबंधित अनेक कलाकृती विविध माध्यमांतून आतापर्यंत सादर झाल्या आहेत. रूपेरी

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग